
पुणे : गुन्हे शाखेच्या भरोसा सेलने विश्रांतवाडी येथील धानोरी जकात नाका जवळील “आर्मोनिया फॅमिली स्पा” (Armonia Family Spa) येथे छापा मारून वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. या कारवाईत दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली.
स्पा मॅनेजर व मालक सुरज भरत शाहू (रा. वाशी, ठाणे आणि सध्या रा. पुणे) याला अटक करण्यात आली असून, त्याच्याविरुद्ध विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम १४३ आणि अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंध कायदा, १९५६ अंतर्गत कलम ३, ४, ५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
४ डिसेंबर रोजी, गोपनीय माहितीच्या आधारे गुडविल स्क्वेअर मॉलच्या दुसऱ्या मजल्यावरील शॉप नंबर २१४ येथे वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे समजले. खात्री करण्यासाठी बनावट ग्राहक पाठवून तपासणी केल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत दोन मोबाईल, २० हजार रुपये रोख रक्कम व २ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल असा एकूण २२,५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
ही यशस्वी कारवाई अप्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपआयुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संगीता जाधव व भरोसा सेलच्या पथकाने पार पाडली.