पुणे : सायबर चोरटे वेगवेगळ्या युक्त्या वापरून अनेकांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करीत आहेत. असाच एक प्रकार बाणेर रस्त्यावरील ‘आयरिंग टॉवर अलोमा काउंटि’ सोसायटीमध्ये घडला. एका ४४ वर्षीय महिलेला सायबर चोरट्यांनी ३४ लाख रुपयांना गंडवल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी चतुशृंगी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता ३१९ (२), ३१८(४), ३, (५), आयटी अॅक्ट ६६ ड अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
संबंधित महिलेने पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी या महिलेला टेलिकॉम अथॉरिटीज ऑफ इंडिया म्हणून बोलत असल्याची बतावणी केली. त्यांना मुंबई गुन्हे शाखेमध्ये मनी लॉन्ड्रींग आणि अनैतिक मानवी वाहतुकीसंबंधी गुन्हा दाखल झाला असून त्यामध्ये आरोपी म्हणून तुमचे नाव असल्याची बतावणी केली. या गुन्ह्यामध्ये करण्यात आलेले फोन कॉल आणि मेसेज करण्यासाठी तसेच वेगवेगळ्या लोकांना धमकवण्यासाठी जे मोबाईल नंबर वापरण्यात आलेले आहेत, ते तुमच्या नावाने रजिस्टर असल्याचे सांगण्यात आले. यासंदर्भात मुंबई पुणे शाखेच्या पोलिसांशी बोलावे लागेल अशी सूचना त्यांना देण्यात आली. त्यांचा फोन कॉल अन्य आरोपीकडे ट्रान्सफर करण्यात आला.
या आरोपीने तो मुंबई क्राईम ब्रँचचा आयपीएस अधिकारी विक्रम सिंग बोलत असल्याची बतावणी केली. आरोपींनी या महिलेला तुम्हाला संशयित आरोपी म्हणून गृहीत धरले असून तुम्ही व्हिडिओ कॉलद्वारे डिजिटल अरेस्टमध्ये आहात असे सांगण्यात आले. तसेच, त्यांना प्रत्यक्ष अटकेची भीती घालून त्यांच्या एचडीएफसी बँकेमध्ये व्यवहार झाले असून त्या बँकेचे कर्मचारी सुद्धा या केसमध्ये सहभागी असल्याची बतावणी केली. या बँक खात्याचे व्हेरिफिकेशन करायचे असल्याचे सांगत त्यांना विविध बँक अकाउंटवरून पैसे ट्रान्सफर करायला सांगण्यात आले. घाबरलेल्या महिलेने आपण असा कोणताही गुन्हा केलेला नसल्याचे सांगितले. तरी देखील आरोपींनी काहीही ऐकून न घेता त्यांना पैसे ट्रान्सफर करायला लावले. अन्यथा अटकेची धमकी दिली. घाबरलेल्या या पीडित महिलेने ३४ लाख रुपये आरोपींच्या खात्यांवर ट्रान्सफर केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी चतु:शृंगी पोलिसांकडे या संदर्भात अर्ज दिला होता. त्या अर्जानुसार पोलिसांनी तपास करून गुन्हा दाखल केला आहे.