
पुणे : बाणेर रस्त्यावर ‘स्पा सेंटर’च्या नावाखाली चालणाऱ्या वेश्याव्यवसायाचा गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी बाणेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्पा मॅनेजर सताउद्दीन मोहम्मद दिलवार हुसेन (वय २२, जुनी सांगवी) याच्यावर पीटा अॅक्ट ३, ४, ५ व भारतीय न्याय संहिता १४३, ३ (५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार रेश्मा कंक यांनी फिर्याद दिली आहे. बाणेर येथील मुरकुटे (पाटील) कॉम्प्लेक्समध्ये मून थाई स्पा नावाने मसाज सेंटर चालवले जात असून याठिकाणी बेकायदा वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी याठिकाणी बनावट ग्राहक पाठवून खात्री केली. त्यावेळी आरोपी पिडीत मुलींना पैशांचे आमिष दाखवीत वेश्या व्यवसाय करवून घेत असल्याचे समोर आले. पोलिसांनी याठिकाणी छापा टाकत पिडीत महिलांची सुटका केली. याप्रकरणी आरोपी हुसेन याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास बाणेर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक महेश बाळकोटगी करीत आहेत.