
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आज प्रत्येक क्षेत्रात काम करत आहे. AI विषयी सुरुवातीपासूनच म्हटले जात आहे की, रोजगाराच्या क्षेत्रात यामुळे माणसांची गरज कमी होईल. याचा सर्वात प्रथम परिणाम कस्टमर केअर क्षेत्रावर झाला आहे. अनेक कंपन्यांनी कस्टमर केअर एक्झिक्युटिव्हच्या नोकऱ्या ५० टक्क्यांपर्यंत कमी केल्या आहेत. नुकत्याच समोर आलेल्या एका अहवालानुसार भविष्यात विविध कंपन्यांचे सीईओचे (CEO) काम देखील AI च करतील.
पॅनासोनिकने कंपनीने त्यांचे संस्थापक कोनसुके मात्सुशिता यांचा AI क्लोन तयार केला आहे. कोनसुके मात्सुशिता यांचे निधन १९८९ साली झाले. त्यांनी पॅनासोनिकला ग्राहक इलेक्ट्रॉनिक्सच्या क्षेत्रात अग्रगण्य कंपनी बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांना जपानमधील सर्वात सन्माननीय उद्योजकांपैकी एक मानले जाते. त्यांचे ‘द पाथ’ नावाचे पुस्तक जपानमधील व्यावसायिकांसाठी आवश्यक वाचन मानली जाते. पॅनासोनिक होल्डिंग्सने दिवंगत संस्थापक कोनसुके मात्सुशिता यांचा AI क्लोन तयार केला आहे. या क्लोनमध्ये त्यांचे लिखाण, भाषणे आणि तीन हजारांपेक्षा अधिक व्हॉइस रेकॉर्डिंग्सचा समावेश करण्यात आला आहे.
कोनसुके मात्सुशिता यांना ‘व्यवस्थापनाची देवता’ किंवा ‘God of Management’ संबोधले जाते. ते जपानच्या व्यवसाय क्षेत्रातील एक अत्यंत सन्मानित व्यक्तिमत्त्व होते. पॅनासोनिकने त्यांना डिजिटल स्वरूपात पुनर्जीवित केले आहे. जेणेकरून त्यांचा अनुभव आणि ज्ञान लोकांपर्यंत पोहोचेल. त्यांच्या हयातीत त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली नव्हती अशा लोकांना त्यांच्या ज्ञानाचा फायदा होईल. हा AI क्लोन हा एक अनोखा प्रयत्न आहे, ज्याद्वारे जुन्या कल्पना आणि नेतृत्वाचे धडे नवीन पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
लोकांना मिळेल प्रशिक्षण
पॅनासोनिक होल्डिंग्सने सांगितले की, संस्थापक कोनसुके मात्सुशिता यांच्याकडून प्रत्यक्ष प्रशिक्षण घेणाऱ्यांची संख्या कमी होत चालल्यामुळे, त्यांनी जनरेटिव्ह AI तंत्रज्ञानाचा वापर करून संस्थापकांचे दृष्टिकोन पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेतला आहे. हे AI मॉडेल, टोकियो विद्यापीठाशी संबंधित मात्सुओ इन्स्टिट्यूटच्या सहकार्याने विकसित करण्यात आले आहे. एखाद्या व्यक्तीच्या विचार करण्याच्या आणि बोलण्याच्या शैलीची पुनर्रचना त्याद्वारे करण्यात आली आहे. कंपनीची योजना आहे की हा डिजिटल क्लोन आणखी प्रगत बनवला जावा, जेणेकरून भविष्यात तो व्यावसायिक निर्णय घेण्यात मदत करू शकेल.
सीईओ आणि संस्थापकांच्या भूमिकेची जागा घेणार ‘एआय’?
पॅनासोनिकच्या या AI मॉडेलनंतर, चर्चा सुरू झाली आहे की जर हे यशस्वी झाले, तर भविष्यात एखाद्या कंपनीच्या सीईओ किंवा संस्थापकांच्या निधनानंतर त्यांचा AI अवतार तयार केला जाईल. अशा परिस्थितीत सीईओ कधी निवृत्त होणार नाहीत, आणि त्या पदासाठी कधीही नव्याने भरती होणार नाही.