डेक्कन वाहतूक विभागात घडला प्रकार : नो पार्किंगमध्ये गाडी लावल्याने केली होती कारवाई
#पुणे : नो पार्किंगमध्ये गाडी लावल्याने वाहतूक पोलिसांनी कारवाई केल्यानंतर चिडलेल्या एका दाम्पत्याने थेट पोलिसांच्या अंगावर हात टाकत त्यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की करण्यात आली. हा प्रकार डेक्कन वाहतूक विभागात घडला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाम्पत्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे कारवाई टाळण्यासाठी या दाम्पत्याने दुचाकीच्या नंबर प्लेटवर बनावट क्रमांक टाकल्याचे समोर आले आहेत.
गणेश कोंडीभाऊ सहाणे आणि त्याची पत्नी सोनम (दोघे रा. वाघेरे कॉलनी, मोरवाडी, पिंपरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. डेक्कन वाहतूक विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद डोंगरे यांनी फिर्याद दिली आहे. गणेश आणि त्याची पत्नी डेक्कन परिसरात आले होते. त्यांनी त्यांची दुचाकी नो-पार्किंगमध्ये लावलेली होती. वाहतूक पोलिसांनी हे वाहन टोईंग करून डेक्कन वाहतूक विभागात आणले. त्यानंतर, सहाणे दाम्पत्य वाहतूक शाखेत आले. त्यांनी गाडीवर का कारवाई केली अशी विचारणा करीत रस्त्यावरच गोंधळ घालण्यास सुरुवात केली. वाहतूक पोलिसांना शिवीगाळ केली. पोलिसांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, सहायक निरीक्षक डोंगरे आणि सहकाऱ्यांना आरोपींनी ‘तुमची नोकरी घालवते’, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
सहाणे दाम्पत्य वापरत असलेल्या दुचाकीला बनावट वाहन क्रमांक असलेली पाटी लावल्याचे चौकशीत उघडकीस आले. थकित दंडाची कारवाई टाळण्यासाठी त्यांनी बनावट वाहन क्रमांकाची पाटी लावल्याचे पोलिसांनी सांगितले.
