
शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पालिकेच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
#पुणे : महापालिकेमधील मोठी आणि मलाईदार पदे पदरात पाडून घेण्यासाठी अधिकाऱ्यांनी केलेला ‘झोल’ समोर आला आहे. महापालिकेच्या उपायुक्तानेच हा घोळ केला आहे. बारावी नापास असताना देखील सिक्कीम मणिपाल विद्यापीठाची ‘एमबीए’ची बनावट पदवी आणि त्याची गुणपत्रिका तयार करून त्याची सेवा पुस्तकात नोंद करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या गैरप्रकारात तत्कालीन शिक्षणाधिकारी व लिपिकांनी साथ दिल्याचे देखील समोर आले आहे. या सर्वांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त सोमनाथ हरिभाऊ बनकर, तत्कालीन शिक्षणाधिकारी सुधाकर तांबे आणि लिपिक राजेंद्र घारे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. बनकर हे सध्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख आहेत. याप्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ते सुधीर रामचंद्र आल्हाट (वय ५४, रा. तानाजीवाडी, शिवाजीनगर) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार पुणे महापालिका कार्यालयात १ जानेवारी २००८ ते जानेवारी २०१६ दरम्यान घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बनकर हे २००८ मध्ये पुणे महानगरपालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसती गृहात रेक्टर म्हणून काम करीत होते. याच कालावधीत त्यांनी सिक्कीम मणिपाल विद्यापीठामधून २००८ व २००९ या शैक्षणिक वर्षांमध्ये एमबीए (एचआरएम) ची पदवी घेतल्याचे भासवले. ही बनावट पदवी खरी असल्याचे भासवत त्याची स्वत:च्या सेवा पुस्तिकेत नोंद करुन घेतली. त्यावर तत्कालिन शिक्षणाधिकारी सुधाकर तांबे यांची स्वाक्षरी घेण्यात आली.
फिर्यादी आल्हाट यांनी बनकर यांची पदवी खरी आहे किंवा नाही याची माहिती घेण्यासाठी सिक्कीम मणिपाल विद्यापीठाकडे माहिती अधिकारात अर्ज केला होता. त्यांना २७ डिसेंबर २०१६ रोजी याबाबत माहिती प्राप्त झाली. त्यामध्ये सिक्कीम मणिपाल विद्यापीठाने सोमनाथ बनकर नावाच्या कोणत्याही विद्यार्थ्याने पदवी घेतली नसल्याचे तसेच ही पदवी बनावट असल्याचे नमूद करण्यात आलेले होते. दरम्यान, हा सर्व प्रकार पालिकेच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर देखील पालिकेचे त्याची दखल घेतली नाही की चौकशी केली नाही. दरम्यान, गुन्हे शाखेने देखील या प्रकरणाचा तपास केला. हा तपास केलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी बनकर यांची ‘एमबीए’ची पदवी बनावट असल्याची खात्री खात्री करुन देखील गुन्हा दाखल केला नाही. तसेच, ४ मे २०२४ रोजी महापालिकेला यासंदर्भात पत्र दिले.
दरम्यान, लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून याची चौकशी सुरू करण्यात आली होती. एसीबीने २१ एप्रिल २०१८ रोजी महापालिकेच्या आयुक्तांना याबाबतचा गोपनीय अहवाल पाठविला होता. या अहवालात बनकर यांची पदवी बनावट असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे.
आणखीही अधिकाऱ्यांची पदवी बनावट असल्याचा संशय
महापालिकेच्या अनेक अधिकार्यांनी बनावट पदवी दाखवून पदरात मोठी पदे पाडून घेतल्याचा संशय आहे. याविषयांवरून तीन-चार वर्षांपूर्वी पालिकेत वादळ उठले होते. त्याच्या चौकशीची मागणी त्यावेळी करण्यात आलेली होती. तसेच, काही अधिकाऱ्यांची नावे देखील समोर आली होती. त्यानंतर कालांतराने हा विषय थंड झाला. बनकर यांच्या बनावट पदवीचा विषय चव्हाट्यावर आल्याने संशयित अधिकाऱ्यांच्या पदव्यांची चौकशी केली जावी अशी मागणी केली जात आहे.