
#पुणे : पोलीस असल्याचे भासवून एका सराफ व्यावसायिकाला फसवून लुटल्याची घटना कर्वेनगरमध्ये उघडकीस आली आहे. चोरट्यांनी तपासणीच्या नावाखाली व्यावसायिकाच्या गळ्यातील ८४ हजार रुपयांची सोन्याची साखळी हिसकावून पळ काढला.
या प्रकरणी सराफाने वारजे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवला असून तपास सुरू केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार सराफी व्यावसायिकाच्या कर्वेनगरमधील दुकानात दोन दिवसांपूर्वी एक व्यक्ती आली. त्या व्यक्तीने पोलिसांसारखी टोपी घातलेली होती आणि त्याने स्वत:ला पोलीस असल्याचे सांगितले. तपासणीच्या बहाण्याने त्याने सराफाला गळ्यातील सोन्याची साखळी दाखविण्यास सांगितले.
व्यावसायिक आरशात पाहत असताना, त्या व्यक्तीने खिशातून एक पाकीट काढून व्यावसायिकाच्या हातात दिले. पाकिटावर “५० हजार रुपये” असे लिहिलेले होते. त्याने व्यावसायिकाला “दोन मिनिटांत येतो” असे सांगत दुकानातून बाहेर पाऊल टाकले.
व्यावसायिकाने काही वेळानंतर पाकिट उघडून पाहिले असता, त्यात पैशांऐवजी वृत्तपत्राची एक घडी ठेवलेली दिसली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सराफाने पोलिसांकडे धाव घेतली.
पोलिसांनी सराफी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, चोरट्याचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे.