
पुणे, मुंबई, ठाण्यात हात साफ केल्याचे आले समोर
पुणे : सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने सराफी दुकानात घुसलेल्या दुकलीला लष्कर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. यामध्ये एका तरुणीचा समावेश आहे. या दोघांनी मिळून पुणे, मुंबई, ठाणे, सातारा तसेच सिंधुदुर्ग परिसरातील सराफी पेढीत अशाच प्रकारे घुसून दागिने लंपास केल्याचे समोर आले आहे.
शेखर हेमराज वाणी (वय ३२ रा. मांजरी, हडपसर), शिवानी दिलीप साळुंखे (वय २४, रा. केशवनगर, मुंढवा, मूळ रा. अकलूज. जि.सोलापूर) अशी अटक आरोपींची नावे आहेत. लष्कर भागात असलेल्या एका सराफी दुकानात ३१ ऑक्टोबर रोजी चोरीची घटना घडली होती. या दुकानात आरोपी वाणी आणि शिवानी हे दोघे खरेदीच्या बहाण्याने आले होते. दागिने पहात असताना काही दागिने या दोघांनी लंपास केले होते. हा प्रकार सीसीटीव्हीमधून उघड झाला होता. त्यानंतर पोलिसांनी या दोघांचा शोध घेण्यास सुरुवात केली होती.
दरम्यान, ठिकठिकाणच्या आणि वेगवेगळ्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यावरून हे आरोपी दुचाकीवरुन मुंढव्याकडे पसार झाल्याचे दिसत होते. पोलिसांनी या दोघांचा शोध घेत त्यांना गजाआड केले. आरोपी शेखर, त्यांची साथीदार शिवानी यांनी पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई, ठाणे, सातारा, तसेच सिंधुदुर्ग परिसरातील सराफी पेढीत चोरी केल्याचे तपासात समोर आले आहे.
त्यांच्याकडून नऊ गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. ही कारवाई सहायक आयुक्त दीपक निकम यांच्या मार्गदर्शनाखाली लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर, पोलीस निरीक्षक प्रदीप पवार, सहायक निरीक्षक विशाल दांडगे, महेश कदम, संदीप उर्किडे, सोमनाथ बनसोडे, रमेश चौधर, सचिन मांजरे यांनी ही कामगिरी केली.