
पुणे / नागपूर : शहर विद्रुपीकरण करणाऱ्या अनधिकृत होर्डिंगबाजांविरोधात पुणे महापालिकेने सुरू केलेल्या अभिनव ‘पुरस्कार’ संकेतस्थळाचे आणि धडक कारवाईचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनःपूर्वक कौतुक केले आहे. पुण्याच्या या अस्सल ‘पुणेरी’ धाटणीतील उपक्रमाचा दाखला देत, आगामी विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर महापालिकेनेही अशीच कठोर कारवाई करावी; तसेच अगदी मुख्यमंत्र्यांच्या नावाने जरी बेकायदा होर्डिंग लागले, तरी ते तात्काळ काढून टाकावे आणि पुरस्कारांच्या यादीत माझेही नाव जाहीर करावे, अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर (एक्स/ट्विट) पोस्ट करत पुणे महापालिका प्रशासनाचे अभिनंदन केले. पुणे महापालिकेने नुकतेच शहर विद्रुप करणाऱ्यांचे ‘पुरस्कार’ एका विशेष संकेतस्थळावर जाहीर करत अनधिकृत होर्डिंगविरोधात अनोखी मोहीम हाती घेतली आहे.
नियम हे पाळण्यासाठीच असतात : मुख्यमंत्री
आपल्या पोस्टमध्ये मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, “पुण्यात सध्या अतिक्रमण आणि विशेषतः अवैध होर्डिंगविरोधात सुरू असलेल्या कारवाईबद्दल मी पुणे महापालिका प्रशासनाचे मनापासून अभिनंदन करतो. शहरातील पायाभूत सुविधांचा नागरिकांना योग्य वापर करता आला पाहिजे, तसेच वाहनांसाठी आणि पायी चालण्यासाठी मोकळी जागा असली पाहिजे. शेवटी नियम हे केवळ जीआर किंवा शासकीय दस्तावेजांत प्रकाशित करण्यासाठी नसतात, तर ते पाळण्यासाठी असतात आणि सर्वसामान्यांचे जीवन सुखकारक करणे हाच त्यामागचा मुख्य हेतू असतो.”
नागपूर अधिवेशनापूर्वी प्रशासनाला सतर्कतेचे आदेश :
बेकायदेशीर होर्डिंग ही केवळ पुण्याचीच नव्हे, तर सर्वत्र असलेली मोठी समस्या असून त्यावर सातत्याने कारवाई होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले. “पुण्याने स्वीकारलेल्या या अभिनव आणि अस्सल पुणेरी संकल्पनेचे कौतुक करावे तितके कमी आहे. उद्या माझ्या नावाचे जरी बेकायदा होर्डिंग लागले, तर तुमच्या पुरस्कारांच्या यादीत माझेही नाव जाहीर करा,” असे ते म्हणाले.
दरम्यान, आगामी काळात नागपूर येथे राज्य विधिमंडळाचे अधिवेशन होणार असून, त्या निमित्ताने शहरात बेकायदेशीर होर्डिंग्जचा धडाका सुरू होण्याची शक्यता लक्षात घेता त्यांनी नागपूर महापालिका प्रशासनालाही सतर्क केले आहे. नागपूर प्रशासनाने आतापासूनच जनजागृती करावी आणि शहर विद्रुप होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे निर्देश देत “नेते असोत की कार्यकर्ते, ते कायम जनतेतच दिसले पाहिजेत, बेकायदा होर्डिंग्जवर नाही,” असा सणसणीत टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला आहे.
#DevendraFadnavis #PMC #PuneNews #IllegalHoardings #PuneriStyle #Nagpur #MaharashtraPolitics #PuneCivic #BreakingNews #MarathiNews






