
पुणे : वृद्ध व पादचारी महिलांना लक्ष्य करून भरधाव दुचाकीवरून गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावून पसार होणाऱ्या इराणी टोळीतील एका सराईत आरोपीला पर्वती पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने शिताफीने अटक केली आहे. पोलिसांनी केलेल्या सखोल तपासात पुणे शहर, काळेपडळ, वारजे, येरवडा आणि इंदापूर परिसरातील तब्बल १० साखळी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
हैदर सलीम इराणी (वय ३०, रा. पठारे वस्ती, इराणी गल्ली, तुळजा भवानी मंदिराजवळ, कदमवाक वस्ती, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पर्वती पोलीस ठाण्याच्या हद्दीतून फिर्यादी यांची आई पायी जात असताना, दोन अनोळखी दुचाकीस्वारांनी भरधाव वेगात येऊन त्यांच्यासमोर दुचाकी आडवी लावली. त्यानंतर त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावून आरोपी पसार झाले होते. याप्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०४(२), ३०९(४), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिता हिवरकर आणि गोकुळ महाजन यांच्या सूचनेनुसार तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल राऊत व पोलीस अंमलदारांनी तपास सुरू केला. पोलीस अंमलदार प्रकाश मरगजे, राकेश सुर्वे आणि किशोर वळे यांनी घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयितांचे छायाचित्र तयार केले. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांकडून माहिती मिळाली की, आरोपी गुन्हा केल्यानंतर बिदर (कर्नाटक) आणि अनंतपूर (आंध्रप्रदेश) येथे पळून गेले होते. दरम्यान, आरोपी हैदर इराणी पुण्यात आला असून तो रेल्वेने रायपूरला पळून जाण्याच्या तयारीत असल्याची खबर मिळताच पोलिसांनी सापळा रचून त्याला शिताफीने ताब्यात घेतले.
आरोपी हैदर इराणी याच्याकडे केलेल्या सखोल चौकशीत त्याने आपल्या साथीदारासह गुन्ह्यात वापरलेली बजाज कंपनीची काळ्या रंगाची ‘पल्सर एनएस’ दुचाकी जप्त करण्यात आली. तसेच आरोपीने पुणे शहर व परिसरात केलेले पर्वती, सहकारनगर, काळेपडळ, वारजे पोलीस ठाणे, येरवडा, इंदापूर या पोलीस ठाण्यात दाखल असलेले गुन्हे उघडकीस आले आहेत.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त (परिमंडळ ०२) मिलिंद मोहिते, सहाय्यक पोलीस आयुक्त गजानन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे, पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर, गोकुळ महाजन, सपोनि विशाल राऊत, पोलीस अंमलदार प्रकाश मरगजे, राकेश सुर्वे, किशोर वळे, सूर्या जाधव, प्रसाद पोतदार, शाहरुख शेख, अमोल दबडे, अमित चिव्हे, मारुती तांदळे, मनोज बनसोड, स्वप्निल घुगे, रणजित घाडगे व गणेश तरंगे यांच्या पथकाने केली.
#ParvatiPolice #PuneCrime #ChainSnatcher #HaiderIrani #IraniGang #PunePolice #CrimeNews #BreakingNews #MahaNews #MarathiNews




