Screenshot
खर्डे पाटलांसह अनेकांवर गुन्हा दाखल; सीसीटीव्ही फोडून सुरक्षारक्षकांना मारहाण केल्याचा आरोप
जेसीबी अन् क्रेनच्या साहाय्याने कंपाउंड-बोर्डची तोडफोड
पुणे: आयटी हबजवळील म्हाळुंगे गावात ‘तीर्थ स्पेसेस युनिट ४ एलएलपी’ या रिअल इस्टेट कंपनीच्या मालकीच्या मौल्यवान सर्वे नं. ९/१० मधील जागेवर गुंडगिरीच्या जोरावर बेकायदेशीर कब्जा करण्याचा आरोप करण्यात आला आहे. अरुण खर्डे पाटील आणि प्रसाद खर्डे पाटील यांनी ४० ते ५० जणांचा जमाव, जेसीबी, क्रेन आणि वाहने आणून सुरक्षारक्षकांना मारहाण केली, सीसीटीव्ही कॅमेरे नष्ट केले आणि कंपाउंड तोडून पत्र्याचे शेड मारत जमिनीवर अतिक्रमण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही घटना २७ जुलै २०२६ रोजी सकाळी ०६:०० ते दुपारी १२:०० वाजेच्या सुमारास म्हाळुंगे गाव, सर्वे नं. ९/१०, ता. मुळशी येथे घडली.
अरुण वेणुनाथ खर्डे पाटील (रा. बावधन, पिंपरी-चिंचवड), प्रसाद अरुण खर्डे पाटील (रा. बावधन, पिंपरी-चिंचवड) यांच्यासह ४० ते ५० अनोळखी व्यक्तींवर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११५(२) (मारहाण), ३२९(३) (गुन्हेगारी मार्गाने अतिक्रमण), ३२४(४) (मालमत्तेचे नुकसान), ३५२ (शांतता भंग/अपमान), ३५१(२) (धमकवणे), २३८ (पुरावा नष्ट करणे), १८९(२) आणि १९१(२) (बेकायदेशीर जमाव जमवणे) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक अभि विजय रौंदळ (वय ३३, रा. मॅनहॅटन, पल्लोड फार्म, बाणेर) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हाळुंगे येथील सर्वे क्र. ९/१० मधील १२६ आर जागा त्यांनी १४ फेब्रुवारी २०२४ रोजी युनियन बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत लिलावातून १०५ कोटी ५ लाख रुपये अधिक स्टॅम्प ड्युटी आणि नोंदणी फी भरून खरेदी केली होती. बँकेने ३१ मार्च २०२४ रोजी या जागेचा ताबा दिला होता. तिथे असलेली जुनी ७ मजली इमारत कायदेशीररीत्या पाडून त्यांनी सरकारी मोजणी करून घेतली होती. तसेच या जागेतून पुणे मेट्रो लाईन ३ गेल्यामुळे त्यांना सरकारी मोबदलाही मिळाला होता.
२७ जुलै २०२६ रोजी पहाटे ६ वाजेच्या सुमारास आरोपी अरुण खर्डे पाटील व प्रसाद खर्डे पाटील यांनी सुमारे ४० ते ५० गुंडांना एकत्र करून या जागेत बेकायदेशीर प्रवेश केला. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे व संपूर्ण सुरक्षा यंत्रणा तोडून नष्ट केली. यानंतर जेसीबी व क्रेनच्या साहाय्याने पूर्व बाजूची सिमेंट-विटांची भिंत व पत्र्याचे कंपाउंड तोडण्यात आले. कंपनीचे सुरक्षारक्षक नितीन वसंत सोनवणे, धनाजी मारुती गाडेकर व शुभम विजय सोनवणे यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना शिवीगाळ करत दमदाटी व हाताने मारहाण करण्यात आली. तसेच भिंतीवरील ‘तीर्थ’ नावाचा बोर्ड फोडून आर्थिक नुकसान केले आणि इंग्रजी ‘L’ आकारात लोखंडी अँगल व पत्रे लावून जागेवर बेकायदेशीर ताबा मारल्याचा आरोप करण्यात आला आहे.
हा संपूर्ण प्रकार घडत असताना अरुण खर्डे पाटील व प्रसाद खर्डे पाटील हे पांढऱ्या रंगाच्या एसयूव्ही गाडीत बसून टोळीला सूचना देत संपूर्ण कारवायांचे नियंत्रण करत होते. सकाळी १० वाजेच्या सुमारास पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी जमावाला बेकायदेशीर कृत्य न करण्याबाबत समज दिली. कंपनीच्या जागेवर झालेली तोडफोड, मारहाण, सीसीटीव्हीचे नुकसान आणि बेकायदेशीर अतिक्रमाणाविरोधात अभि रौंदळ यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अखेर खर्डे पाटील पिता-पुत्रासह त्यांच्या ४०-५० सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला असून पुढील कायदेशीर कारवाई व तपास सुरू आहे.
#Mhalunge #PuneRealEstate #LandGrab #KhardePatil #PuneCrime #Mulshi #PunePolice #BreakingNews #CrimeNews #MarathiNews




