ट्रेंडिंगताज्या बातम्यापुणेमहाराष्ट्रब्रेकिंग न्यूजविशेष लेखव्हिडिओ
क्राईम

स्नॅपचॅटवर ‘प्रिन्सिका’ बनून १.५० लाखांचा गंडा! फोनवर मुलीच्या आवाजात बोलणाऱ्याला सायबर पोलिसांकडून अटक

04 Sep 2026, 10:41 AM • TheLakhantalk
Spread the love

हॉटेल मॅनेजमेंट केलेल्या तरुणाचा धक्कादायक कारनामा; क्रिप्टो करन्सीत गुंतवणुकीच्या बहाण्याने केली फसवणूक!

पुणे: सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मुलीच्या नावाने बनावट प्रोफाईल तयार करून आणि चक्क मुलीच्या आवाजात फोनवर संभाषण करून एका तरुणाला जाळ्यात ओढत दीड लाख रुपयांची क्रिप्टो फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. तब्बल सात महिने मुलीच्या आवाजात बोलून विश्वास संपादन केल्यानंतर क्रिप्टो वॉलेटवर पैसे ट्रान्सफर करून घेणाऱ्या उच्चशिक्षित आरोपीला पुणे शहर सायबर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्याला अटक केली.

कुणाल जितेंद्र अदमाने (वय २५, रा. पर्वती परिसर) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१९(२) (तोतयागिरी), ३१८(४) (फसवणूक) सह माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act) कलम ६६ (सी) व ६६ (डी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या स्नॅपचॅट खात्यावर “प्रिन्सिका जोशी” नावाच्या प्रोफाईलवरून फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली. आरोपी कुणाल याने स्वतःची खरी ओळख लपवून स्नॅपचॅटवर मुलीचा आयडी वापरला आणि मोबाईलवर थेट मुलीच्या आवाजात संवाद साधत तक्रारदाराचा पूर्ण विश्वास संपादन केला.

जवळपास सहा ते सात महिने नियमित चॅटिंग आणि फोनवर संभाषण झाल्यानंतर ‘प्रिन्सिका’ने तक्रारदाराला “मी क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करते, यात प्रचंड नफा आणि आकर्षक परतावा मिळतो,” असे सांगून जाळ्यात ओढले. तिच्यावर आंधळा विश्वास ठेवून तक्रारदाराने स्वतःच्या क्रिप्टो वॉलेटमधून १४६८ USDT (अंदाजे १ लाख ५० हजार रुपये) आरोपीच्या क्रिप्टो वॉलेटवर ट्रान्सफर केले.

काही दिवसांनी तक्रारदाराने गुंतवणुकीच्या परताव्याबाबत आणि नफ्याबाबत विचारणा करण्यास सुरुवात केली. त्यानंतर ‘प्रिन्सिका’ नावाच्या या अकाउंटवरून प्रतिसाद देणे बंद झाले. आरोपीने स्नॅपचॅट व इन्स्टाग्राम अकाउंट बंद करून संपर्क तोडला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदाराने सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली.

तपासादरम्यान पोलिसांसमोर मोठा पेच निर्माण झाला होता; तक्रारीत फसवणूक करणारी ‘प्रिन्सिका जोशी’ नावाची मुलगी होती, तर तांत्रिक विश्लेषणातून पर्वती येथील ‘कुणाल अदमाने’ या पुरुषाचे नाव समोर येत होते. पोलिसांनी संशयित कुणाल अदमाने याला ताब्यात घेऊन खाक्या दाखवताच तोच स्वतः मुलीचा आवाज काढून ७ महिने फोनवर बोलत असल्याचे स्पष्ट झाले.

ही कारवाई अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते आणि पोलीस उपायुक्त (आर्थिक व सायबर) विवेक मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे, पोलीस निरीक्षक शरद शेळके तसेच पोलीस अंमलदार कृष्णकांत देसाई, बाळासो चव्हाण, जान्हवी बढेकर, रवींद्र साळवे, संदीप मुंढे, संदीप कारकूड, सुप्रिया होळकर, कृष्णा मारकड, श्रीकृष्ण नागटीळक व सोनाली चव्हाण यांच्या पथकाने केली.

==चौकट==
“अनोळखी सोशल मीडिया मैत्री व क्रिप्टो आमिषाला बळी पडू नका” – पोलिसांचे आवाहन

सोशल मीडियावर फोटो, नाव किंवा आवाजावरून समोरील व्यक्तीची खरी ओळख पटत नाही. बनावट आयडी बनवून भावनिक व आर्थिक फसवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. नागरिक किंवा तरुणांनी क्रिप्टो करन्सीत कमी वेळेत मोठ्या परताव्याचे आमिष दाखवणाऱ्यांवर विश्वास ठेवू नये. अशी फसवणूक झाल्यास तातडीने सायबर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पुणे पोलिसांकडून करण्यात आले आहे.

#PuneCyberPolice #CyberCrime #SnapchatFraud #CryptoScam #PuneCrime #CyberSecurity #PuneNews #BreakingNews #CrimeNews #MarathiNews