ट्रेंडिंगताज्या बातम्यापुणेमहाराष्ट्रब्रेकिंग न्यूजविशेष लेखव्हिडिओ
ताज्या घडामोडी

प्रसूतीच्या असह्य कळा… अन् ‘ती’ बनली रणरागिणी; वाहतूक कोंडीतून १९ वर्षीय तरुणीने गर्भवतीला पोहोचविले रुग्णालयात

22 Aug 2026, 11:17 AM • TheLakhantalk
Spread the love

पुणे : प्रसूतीच्या असह्य कळा, त्यात वाहतूक कोंडी आणि रुग्णालयाचा शोध… अशा अत्यंत बिकट परिस्थितीत अवघ्या १९ वर्षीय वर्षा सिद्धार्थ शिंदे हिने धाडस आणि संवेदनशीलतेचे दर्शन घडवत गर्भवती महिलेला स्वतः चारचाकी चालवत रुग्णालयात पोहोचविले. सातारा रस्त्यावरील दुगड रुग्णालयानेही परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने उपचार सुरू केले. काही वेळातच महिलेची सुखरूप नैसर्गिक प्रसूती झाली आणि तिने १ किलो ७०० ग्रॅम वजनाच्या मुलीला जन्म दिला. सध्या आई आणि बाळ दोघांचीही प्रकृती सुखरूप आहे.

कोथरूडमधील एका अनाथालयाच्या कार्यालयात काम करणाऱ्या साधारण तिशीतील ‘सुमन’ (नाव बदलले आहे) यांना गुरुवारी (ता. २०) दुपारी तीनच्या सुमारास अचानक प्रसूतीच्या कळा सुरू झाल्या. त्यांची प्रसूतीसाठी हडपसर येथील साने गुरुजी रुग्णालयात नोंदणी करण्यात आली होती. मात्र, कळा तीव्र होत असल्याने हडपसरपर्यंत पोहोचणे कठीण होते. त्यामुळे जवळच्या रुग्णालयात त्यांना दाखल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, उपचाराचा खर्च परवडणारा नसल्याचे लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांसह मदतीला धावून आलेल्या व्यक्तींनी अन्य रुग्णालयाचा शोध सुरू केला.

यावेळी कार्यालयातील अवघ्या १९ वर्षीय वर्षा शिंदे हिने अमृता रेठरेकर आणि अनामिका सरकार यांच्या मदतीने सुमन यांना चारचाकीतून रुग्णालयाच्या दिशेने नेण्यास सुरुवात केली. मात्र, रस्त्यातच प्रसूतीच्या कळा असह्य झाल्या. बाळाचा काही भाग बाहेर आल्याने परिस्थिती अधिकच गंभीर झाली. तातडीने रुग्णालयात दाखल करणे गरजेचे असल्याचे लक्षात येताच वर्षाने सातारा रस्त्यावरील दुगड रुग्णालय गाठले.

गाडी थांबवत वर्षा आणि तिच्या सहकाऱ्यांनी रुग्णालयातील कर्मचारी तसेच डॉ. मिलिंद दुगड यांना परिस्थितीची माहिती दिली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी क्षणाचाही विलंब न करता महिलेला गाडीतून बाहेर काढून प्रसूतीगृहात दाखल केले. वैद्यकीय पथकाने तातडीने उपचार सुरू केले आणि काही वेळातच महिलेची नैसर्गिक प्रसूती झाली.

या घटनेत वर्षा शिंदे हिने दाखविलेल्या धाडसामुळे आई आणि बाळाला वेळीच वैद्यकीय मदत मिळू शकली. तिच्यासोबत अमृता रेठरेकर आणि अनामिका सरकार यांनीही परिस्थिती हाताळण्यासाठी मदत केली. दुगड रुग्णालयाच्या तत्पर प्रतिसादामुळे या महिलेची सुरक्षित प्रसूती होऊन नवजात मुलीचे प्राणही वाचले.

दुगड रुग्णालयाच्या प्रशासक लीना दुगड म्हणाल्या, “वर्षा शिंदे या तरुणीच्या प्रयत्नामुळे आता आई आणि बाळ दोघेही सुखरूप आहेत. सामाजिक उत्तरदायित्व म्हणून आम्ही या महिलेला मोफत सेवा देऊ शकलो, याचे आमच्या संपूर्ण टीमच्या चेहऱ्यावर समाधान आहे. पैशांपेक्षा जीव मोठा आहे. रुग्णालय केवळ भिंती, बेड आणि शस्त्रक्रियागृहाने बनत नाही; ते माणुसकी, संवेदनशीलता आणि संकटाच्या क्षणी एकत्र धावून येणाऱ्या हातांनी बनते.”

नकारात्मक घटनांच्या काळोखातही माणुसकी आणि सामाजिक संवेदनशीलता जिवंत असल्याचा प्रत्यय या घटनेतून आला. प्रसंगी स्वतःचा विचार न करता धाडसाने पुढाकार घेणाऱ्या १९ वर्षीय वर्षा शिंदे आणि तिला साथ देणाऱ्या अमृता रेठरेकर, अनामिका सरकार यांचे प्रयत्न तसेच दुगड रुग्णालयाच्या तत्परतेमुळे एका आईला सुरक्षित प्रसूती आणि एका नवजात बाळाला सुरक्षित आयुष्याची सुरुवात मिळाली.

#VarshaShinde #Pune #RealHero #HumanityFirst #InspiringStory #DugadHospital #PuneNews #PositiveNews #MahaNews #MarathiNews