
पुण्यात खळबळ उडवून देणाऱ्या घटनेचा दहा वर्षांनी निकाल
विशेष न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
पुणे: शहराला हादरवून सोडणाऱ्या कात्रज हत्याकांडाचा निकाल तब्बल १० वर्षांनंतर लागला आहे. चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची निर्घृण हत्या करून तिचे कापलेले शिर आणि कुऱ्हाड घेऊन भररस्त्यात फिरणाऱ्या रामचंद्र सेहु चव्हाण या आरोपीला विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाने ‘आजन्म कारावासाची’ (जन्मठेप) शिक्षा सुनावली आहे.
सोनाबाई रामचंद्र चव्हाण (वय ५०) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. ९ ऑक्टोबर २०१५ रोजी कात्रज येथील ‘गंगा ओशन सोसायटी’मध्ये ही घटना घडली होती. आरोपी, त्याची पत्नी एका मोकळ्या भूखंडावर पत्र्याच्या खोलीत रहात होते. आरोपीला आपल्या पत्नीचे जावयासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. पत्नी सोनाबाई आणि जावई यांचे अनैतिक संबंध आहे याचा संशय, पत्नी चांगली वागणूक देत नाही, जेवण वाढत नाही याकारणावरून पत्नीचा खून केल्याची कबुली चव्हाणने तपासात दिली होती.
आरोपी रामचंद्र चव्हाण याने आपल्या पत्नीवर चारित्र्याचा संशय घेऊन कुऱ्हाडीने तिचे मुंडके, हात आणि पाय धडावेगळे केले होते. एवढ्यावरच न थांबता, रक्ताने माखलेली कुऱ्हाड आणि पत्नीचे कापलेले शिर हातात घेऊन आरोपी कात्रजच्या दिशेने चालत निघालेला होता. हे दृश्य पाहून पुणेकर सुन्न झाले होते. तत्कालीन नागरिकांनी आणि पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याला ताब्यात घेतले होते.
या अमानवीय गुन्ह्याचा सखोल तपास तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक शेखर शिंदे यांनी केला होता. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पोलीस उप आयुक्त (परिमंडळ २) मिलिंद मोहिते यांनी हे प्रकरण ‘दत्तक’ घेऊन त्याचा वेळोवेळी पाठपुरावा केला. न्यायालयात सबळ पुरावे आणि साक्षीदार टिकवून ठेवण्यासाठी पोलीस पथकाने विशेष मेहनत घेतली.
विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश सुमित जोशी यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली. सरकारी वकील अग्रवाल यांनी प्रभावी युक्तिवाद करत आरोपीला कठोर शिक्षेची मागणी केली. ९ मे २०२६ रोजी न्यायालयाने सर्व पुरावे ग्राह्य धरत रामचंद्र चव्हाण याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
हा निकाल मिळवून देण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे आणि उपायुक्त मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) कैलास कोडग, उपनिरीक्षक रमेश चौधरी व त्यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.
#PuneNews #BreakingNews #CrimeNews #CourtVerdict #Maharashtra






