
पुणे : गोव्यातील स्वस्त विदेशी मद्याची तस्करी करून राज्यात विक्री करणाऱ्या टोळीचा राज्य उत्पादन शुल्क विभागाने पर्दाफाश केला असून, दोन जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत सुमारे २० लाख ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अटक करण्यात आलेल्यांची नावे प्रेम सोमनाथ भांडवलकर (रा. बारामती) आणि अक्षय अधिकराव देशमुख (रा. सोलापूर) अशी आहेत. इंदापूर तालुक्यातील कांदलगाव परिसरातून मद्य तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पथकाने सापळा रचून मालवाहू वाहनाचा पाठलाग केला आणि वाहन अडवून तपासणी केली. त्यावेळी वाहनातून २५ प्लास्टिक ड्रम तसेच मद्याच्या बाटल्यांचे १,४०० बुच जप्त करण्यात आले.
या कारवाईनंतर पथकाने सोलापूर जिल्ह्यातील माढा येथे अक्षय देशमुख याच्या घरावर छापा टाकला. तेथून गोव्यातील विदेशी मद्याच्या बाटल्या, रिकाम्या बाटल्या आणि सुमारे २,००० बुच जप्त करण्यात आले. तसेच सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातही संबंधित ठिकाणी कारवाई करण्यात आली.
प्राथमिक तपासात, गोव्यातून स्वस्त दरात मद्य मोठ्या प्लास्टिक ड्रममध्ये आणले जात असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर हे मद्य बाटल्यांमध्ये भरून राज्यात चढ्या दराने विकले जात होते.
ही कारवाई उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख आणि पुणे विभागाचे अधीक्षक अतुल कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अशोक शितोळे, सत्यवान गोगावले, तसेच दुय्यम निरीक्षक सागर साबळे आणि प्रदीप झुंजारक यांच्या पथकाने केली.






