
बाणेरच्या बांधकाम साईटवर कामगाराचा मृत्यू; निष्काळजीपणाचा आरोप, गुन्हा दाखल
पुणे : बाणेर परिसरातील बांधकाम साईटवर काम करत असताना कामगाराच्या डोक्यावर लोखंडी पाईप पडून त्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांविरुद्ध निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बाणेर येथील पल्लोड फार्म्स परिसरातील वायआरके व्हेंचर्स यांच्या ‘यू.व्ही. होम्स’ या बांधकाम साईटवर २८ मार्च रोजी दुपारी घडली.
करिम चमत्कार शेख (वय ३५) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. शुभम राजेश अवस्थी (वय २८), इंजिनिअर विशाल व्यंकटराव काटे (वय ४९) तसेच वायआरके व्हेंचर्स कंपनीचे मालक, युव्ही होम्स कन्ट्रक्शन साईटचे प्रोजेक्ट मॅनेजमेंटचे संबंधित लोक यांच्यावर भान्यास १०६(१), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी रबिऊल राहीद शेख (वय ३२, रा. बावधन) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करीम हे फिर्यादीच्या बहिणीचे पती आहेत. करीम संबंधित साईटवर शटरिंग व काँक्रीटचे काम करत होते. साईटवर सेफ्टीसाठी असलेल्या लोखंडी जाळी व पाईप काढण्याचे काम सुरू असताना वरून अचानक लोखंडी पाईप आणि जाळी करिम शेख यांच्या डोक्यावर पडली. या गंभीर दुखापतीमुळे त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेत साईटवर कोणतीही योग्य सुरक्षा व्यवस्था नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. कामगारांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणाने काम केल्यामुळे हा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी शुभम अवस्थी, अभियंता विशाल काटे तसेच वायआरके व्हेंचर्स व यू.व्ही. होम्स कंपनीशी संबंधित इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक केकान करत असून, बांधकाम साईटवरील सुरक्षेच्या नियमांबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.





