
प्रशासनाकडे नाही निश्चित आकडा : आपापल्या नातेवाईकांशी फोनद्वारे संपर्क
पुणे : इराण आणि अमेरिकेच्या संभाव्य युद्धाची ठिणगी उडाली असून इराणणे एकाच वेळी आठ देशांवर हल्ले केले आहेत. अमेरिकेचे युएई, बहरीन, कुवैत, कतार, ओमान, सौदी अरेबिया, जॉर्डन आणि इराक या देशांमध्ये लष्करी तळे आहेत. इराणने यापूर्वीच या देशांना अमेरिकेला आश्रय देणाऱ्यांना धडा शिकवला जाईल असा इशारा दिला दिलेला होता. दरम्यान, दुबईवर हल्ला झाल्यानंतर पुण्यामध्ये काळजी पसरली आहे. पुण्यामधून दुबई फिरायला गेलेल्या शेकडो भारतीयांच्या चिंतेने कुटुंबीयांना ग्रासले आहे. केंद्र सरकारने यासंदर्भात मार्गदर्शक सूचना (एडवायजरी) दिलेल्या होत्या. परंतु, पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे याबाबत अद्याप कोणताही नेमका आकडा नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अनेकांनी आपापल्या नातेवाईकांना संपर्क साधून सुरक्षित असल्याची खात्री करायला सुरुवात केली आहे.
इराणकडून दुबईच्या पाम जुमेराह शहरावर क्षेपणास्त्र डागण्यात आले. या शहरातील अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्या असून ठिकठिकाणी आगीचे लोळ उठताना दिसत आहेत. या घटनेचे अनेक व्हिडिओ ‘एक्स’वर व्हायरल झाले आहेत. दुबईमधील सर्वात उंच इमारत असलेली बुर्ज खलिफा इमारत देखील रिकामी करण्यात आली आहे. दरम्यान, पुण्यामधून अनेकजण दुबईमध्ये पर्यटनाकरिता गेलेले आहेत. शहरातील अनेक व्हाट्सअप ग्रुपवर याविषयीच्या चर्चा सुरू होत्या. काही जणांनी आपले नातेवाईक दुबईत अडकल्याचे सांगितले. एका कुटुंबियाने सांगितले की, त्यांचे नातेवाईक सकाळी बुर्ज खलिफामध्ये गेलेले होते. मात्र, काही वेळाने त्यांना इमारत रिकामी करण्यास सांगण्यात आले. तर, दुसऱ्या एका नागरिकाने सांगितले की, आमचे नातेवाईक दुबईला गेलेले आहेत. त्यांच्याशी संपर्क झाला असून ते सुरक्षित आहेत. मात्र, त्यांना आता तिकडे राहण्याची भीती वाटू लागली आहे.
या सर्व परिस्थितीत प्रशासनाकडून अद्याप तरी नव्याने कोणत्याही सूचना निर्गमित करण्यात आलेल्या नाहीत. याविषयी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की केंद्र शासनाकडून एडवायजरी जारी केली जाते. त्याचे पालन केले जाते. दुबईला पुण्यामधून किती लोक गेले आहेत याविषयी तूर्तास तरी निश्चित आकडा सांगता येणार नाही. शासनाकडून मार्गदर्शक सूचना येतील त्याचे पालन केले जाईल. नागरिकांना मदत करण्याकरिता आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी केल्या जातील, असे ते म्हणाले. दरम्यान, प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची माहिती न मिळाल्याने कुटुंबीय मात्र चिंताग्रस्त झालेले आहेत.
#DubaiAttack, #IranUSConflict, #GulfTensions, #PuneNews, #BreakingNews, #DubaiCrisis, #MiddleEastConflict, #UAEAlert, #BurjKhalifa, #PalmJumeirah, #IndiaNews, #MaharashtraNews, #GlobalCrisis, #TravelAlert, #WarTension, #DubaiUpdate, #InternationalNews, #PuneResidents, #CrisisUpdate, #NewsFlash






