
पुणे : धनकवडी परिसरातील राजमुद्रा हौसिंग सोसायटीत विनापरवाना सुरू असलेल्या अवैध हुक्का पार्लरवर सहकारनगर पोलिसांनी छापा टाकून मालकासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत विविध फ्लेवरचे हुक्का साहित्य असा एकूण १२,४९५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी राजसिंग भजनसिंग गोरोवाडा (वय ३५, रा. धनकवडी) याच्यासह पारस परमानंद शर्मा (२४), सुभाष मानसिंग गिरी (२०), तिलक भोला तिवारी (३५) व नारायण मेघे आचार्य (३४) यांच्यावर सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४३/२०२६ दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम १२३, ३(५) तसेच सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम २०१८ चे कलम ४अ व २१अ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस हवालदार अमोल पवार यांना बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. राजमुद्रा हौसिंग सोसायटीतील ‘श्री गुरु नानक कृपा’ इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील टेरेसवर अवैधरीत्या हुक्का पार्लर सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तात्काळ छापा टाकला.
पोलिसांनी टेरेसवरील लाकडी दरवाजा उघडून आत प्रवेश केला असता सहा टेबल मांडलेली आढळली. त्यापैकी चार टेबलांवर आठ जण हुक्का सेवन करताना आढळले. किचनमध्ये विविध फ्लेवरचे हुक्का भरलेले चिलीम, हुक्का पॉट व इतर साहित्य सापडले. पंचांसमक्ष हा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त (पश्चिम) राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते आणि सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार घोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश कर्चे व सहकारनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली.
#पुणे #धनकवडी #हुक्का_पार्लर #अवैधकारवाई #सहकारनगरपोलीस #CrimeNews #PunePolice #PoliceAction #IllegalHookah #PuneCrime #BreakingNews #MarathiNews #PoliceRaid #LawAndOrder #CityCrime






