
पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि सहायक निरीक्षक विश्वनाथ तोडकरी यांचा समावेश
पुणे : कल्याणीनगरमध्ये १९ मे २०२४ रोजी झालेल्या भीषण पोर्शे अपघात प्रकरणात दोन आयटी इंजिनिअरचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांच्या निष्काळजीपणाचा आरोप सातत्याने केला जात होता. या प्रकरणात मोठी प्रशासकीय कारवाई करत येरवडा पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक (गुन्हे) राहुल जगदाळे आणि सहायक पोलीस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी यांना शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. पोलीस महासंचालक कार्यालयाकडून याबाबतचे आदेश देण्यात आले.
ही कारवाई अपघातप्रकरणी कर्तव्यात कसूर, अपुरी माहिती देणे आणि योग्य ती तात्काळ कार्यवाही न केल्याच्या ठपक्यावर करण्यात आली आहे. 19 मे 2024 च्या मध्यरात्री, कल्याणीनगर परिसरात अल्पवयीन चालक चालवीत असलेल्या भरधाव पोर्शे कारने मोटारसायकलवरून जाणाऱ्या तरुण तरुणीला जोरदार धडक दिली होती. या भीषण अपघातात अनिश अवधिया आणि अश्विनी कोष्टा या आयटी अभियंत्यांचा जागीच मृत्यू झाला होता. अपघातानंतर अनेक गंभीर त्रुटी तपासात समोर आल्या होत्या. विशेषतः घटनास्थळी पोहचलेल्या दोन पोलीस अधिकाऱ्यांनी अपघाताची माहिती कंट्रोल रूमला कळवण्यात दुर्लक्ष केले, ज्यामुळे अपघाताची माहिती रात्री ऑन ड्युटी असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहचली नव्हती. त्यामुळे त्यांच्यावरती कारवाई करण्यात आली आहे.
या अपघात प्रकरणात केवळ वरिष्ठ अधिकाऱ्यांवरच नव्हे, तर प्रत्यक्षदर्शी म्हणून घटनास्थळी पोहचलेल्या दोन पोलिसांवरही कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस शिपाई अमित शिंदे आणि आनंदा भोसले या दोघांना पुढील पाच वर्षे त्यांच्या पदाच्या मूळ वेतनावर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबतचा प्रस्ताव मागील वर्षी पुणे पोलिसांनी पोलीस महासंचालक कार्यालयाला पाठविला होता. त्यानंतर, पोलीस महासंचालक कार्यालयाने मागील आठवड्यात याबाबतचा आदेश दिला.
या आदेशाला जगदाळे आणि तोडकरी आव्हान देण्याची शक्यता आहे. त्याकरिता त्यांना राज्य शासनाकडे परवानगी घ्यावी लागू शकते. त्यानंतर ते मॅटमध्ये जाऊ शकतात.
काय होती घटना?
कल्याणीनगर येथे लँडमार्क सोसायटीजवळ रविवार, १९ मे रोजी पहाटे अडीचच्या सुमारास हा भीषण अपघात घडला होता. बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल यांच्या १७ वर्षीय ८ महीने वयाच्या मुलाने मद्यधुंद अवस्थेत बेदरकार पद्धतीने आलिशान पोर्शे कार चालवीत एका मोटारसायकलला धडक दिली होती. या अपघातात अनिश अवधिया (वय २७) व अश्विनी कोस्टा (वय २५) यांचा जागीच मृत्यू झाला होता. हे दोघेही आयटी अभियंता होते. या अल्पवयीन मुलावर भादवि कलम २७९, ३०४ (अ), ३३७, ३३८, ४२७, मोटार वाहन अधिनियम कलम १८४, ११९/१७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी अकिब रमजान मुल्ला (वय २४, रा. चंदननगर, मुळ रा. लोकमान्य नगर, आसरा चौक, सोलापूर) यांनी फिर्याद दिलेली आहे.
नेमके काय घडले होते?
आरोपी मुलगा बारावी उत्तीर्ण झाला होता. आनंद साजरा करण्याकरिता तो मित्रांसह पार्टी करायला मुंढवा येथील कोजी रेस्टॉरंटमध्ये गेला होता. तेथे दारू प्यायल्यानंतर तो मित्रांसह मॅरियट सुटसमधील ब्लॅक नावाच्या पबमध्ये गेला होता. याठिकाणी पार्टी करून तो दोन मित्रांना घेऊन पोर्शे कारमध्ये बसला. ड्रायव्हरला शेजारी बसवत त्याने प्रचंड वेगात कोरेगाव पार्क, नार्थमेन रस्ता, आगाखान पूलावरून कल्याणीनगर विमानतळ रस्त्यावरून गाडी दामटवण्यास सुरुवात केली होती. दरम्यान, अनिस, अश्विनी, फिर्यादी अकीब आणि त्यांचे काही मित्र कल्याणीनगर येथील बॉलर पबमधून पार्टी करून बाहेर पडले होते. अनिस आणि अश्विनी जात असलेल्या मोटार सायकलला याच वेळी आरोपी मुलाच्या गाडीची धडक बसली होती. त्यातच त्यांचा मृत्यू झाला होता.
बाल न्याय मंडळाविषयी होती तीव्र नाराजी
नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या हवाली केले होते. दरम्यान, या मुलाला वाचविण्यासाठी चालकाला उभे करून त्याच्यावर आरोप लावण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षदर्शी नागरिकांच्या जागरुकतेमुळे या मुलावर गुन्हा दाखल झाला. त्याला बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आले होते. त्याला अवघ्या १५ तासांच्या आतच जामीन मिळाला होता. त्याला वाहतूक समस्येवर ३०० शब्दांचा निबंध लिहिणे, चांगल्या संगतीत ठेवणे, १५ दिवस वाहतूक नियमन करणे आदी अटींवर जामीन मंजू र करण्यात आला होता. यावरून पुणेकरांनी संताप व्यक्त केला होता. त्यानंतर पोलिसांनी याविषयी बाल न्याय मंडळासमोर अपील सादर करीत निर्णयाचा पुनर्विचार करण्याची विनंती केली. बाल न्याय मंडळाने या मुलाची रवानगी १४ दिवसांसाठी बालसुधार गृहात केली होती. आता त्याची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. यापूर्वी बाल न्याय मंडळाला अल्पवयीन आरोपीबाबतचा साधारण १५० पानांचा अहवाल सादर करण्यात आला होता. त्यानंतर, सविस्तर आरोपपत्र दाखल करण्यात आले. त्यानंतर, कलम १७३ (८) प्रमाणे आणखी विस्तृत आणि सविस्तर आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते.
पुराव्यांसोबत झाली होती छेडछाड
या गुन्ह्यामधील पुराव्यांमध्ये छेडछाड झाल्याचे समोर आल्यानंतर या प्रकरणात भादवि २०१, १२० ब, २१३, २१४, ४६७ या कलमांची वाढ करण्यात आली. पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी विशाल अगरवाल, ससूनचा फॉरेन्सिक विभागाचा प्रमुख डॉ. अजय तावरे, सीएमओ डॉ. श्रीहरी हाळनोर, अतुल घटकांबळे यांना अटक करण्यात आली होती. डॉ. तावरे आणि डॉ. हाळनोर यांच्या प्रकरणात भ्रष्टाचार अधिनियम सन १९८८ चे कलम ७, ७(अ), १३ मोटार वाहन कायदा कलम १८४, १८५,११९/१७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
रक्ताचे बदलले होते नमुने; शिवानी अगरवालला झाली होती अटक
अल्पवयीन मुलाची आई शिवानी अगरवाल हिला देखील अटक करण्यात आली होती. या मुलाच्या वैद्यकीय तपासणीदरम्यान त्याच्या रक्ताचे नमुने बदलण्यात आले होते. त्याजागी शिवानी अगरवालचे नमुने घेण्यात आले होते. तसेच, अश्पाक बाशा मकानदार (वय ३६, रा. धानोरी), अमर संतोष गायकवाड (वय २७, रा. सुभाष नगर, नवी खडकी, येरवडा) या दोघांना ससूनच्या डॉक्टरांना पैसे दिल्याच्या आणि पुराव्यांशी छेडछाड केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली होती.
वडील विशाल अगरवाल यांना झाली होती तीन वेळा अटक
आरोपी अल्पवयीन मुलाचा वडील विशाल अगरवाल याला चालकाचे अपहरण करून त्याला अपघाताचा गुन्हा स्वत:वर घेण्याची सक्ती करण्यात आल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्याला या प्रकरणात तिसऱ्यांदा अटक झाली होती. सुरुवातीला त्याला अल्पवयीन मुलाला गाडी चालवायला देणे, पार्टीला परवानगी देणे याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर चालकाच्या अपहरणप्रकरणी अटक करण्यात आली. या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी मिळाल्यावर आता अपघाताच्या गुन्ह्यामधील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.
कोझी आणि ब्लॅकशी संबंधित व्यक्तींची अटक
अल्पवयीन आरोपी आणि त्याच्या अल्पवयीन मित्रांना दारू दिल्याप्रकरणी तसेच बारमध्ये प्रवेश दिल्याप्रकरणी कोझी हॉटेलचे मालक नमन भुतडा, प्रल्हाद भुतडा, व्यवस्थापक सचिन काटकर, ब्लॅक हॉटेलचे व्यवस्थापक सचिन सांगळे, जयेश बोनक, जितेश शेवानी यांना देखील अटक करण्यात आली होती.
आजोबा सुरेंद्र अगरवाल देखील अडचणीत
अल्पवयीन आरोपीचा गुन्हा स्वत:च्या अंगावर घेण्यासाठी चालकाचे अपहरण करण्यात आले होते. या प्रकरणी सुरेंद्रकुमार ब्रह्मदत्त अगरवाल (वय ७७) आणि विशाल सुरेंद्रकुमार अगरवाल (वय ५०, दोघे रा. बंगला क्रमांक एक, ब्रह्मा सनसिटी, वडगाव शेरी) यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम ३४२ (चुकीच्या पद्धतीने कैदेत ठेवणे), कलम ३६५ (अपहरण), कलम ३६८ (बेकायदा लपवून ठेवणे किंवा डांबून ठेवणे), कलम ५०६ (धमकावणे) आदी कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी गंगाधर शिवराज हेरीक्रुब (वय ४२) यांनी फिर्याद दिली होती.
गुन्हे शाखेचा कसून तपास आणि आरोपपत्र
‘पोर्श’ अपघात प्रकरणात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बारकाईने लक्ष घातले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेने तपास करून विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. साधारणपणे ९०० पानांचे हे आरोपपत्र गुरुवार, २५ जुलै रोजी न्यायालयात सादर करण्यात आले होते. या आरोपपत्रामध्ये साधारणपणे ५० पेक्षा अधिक मूळ साक्षीदार, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांचे जबाब नोंदवण्यात आलेले होते. यासोबतच सीसीटीव्ही चित्रीकरणासह आरोपींच्या मोबाइलचे तांत्रिक विश्लेषण, प्रादेशिक न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेचा अहवाल, घटनास्थळाचा पंचनामा, क्रॅश इम्पॅक्ट असेसमेंट अहवाल, तांत्रिक पुरावे इत्यादी महत्त्वपूर्ण पुरावे या आरोपपत्रातून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने न्यायालयात सादर केले होते.







