
बनावट आयएफएससी कोड, व्हॉउचर्स अन् ईआरपी सिस्टीममध्ये छेडछाड करून पैसे लाटले
बाणेर/बालेवाडी: पुण्यातील बालेवाडी येथील नामांकित ‘मोबिलिटी स्मार्ट सोल्यूशन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ (Mobility Smart Solutions India Pvt. Ltd.) या कंपनीत २ कोटी ४५ लाख ३६ हजार ५८४ रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे. कंपनीच्या एका वरिष्ठ कर्मचाऱ्याने बनावट व्हॉउचर्स, खोटे खरेदी चलन (Invoices), फेरफार केलेले बँकेचे आयएफएससी (IFSC) कोड आणि चक्क कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचा (CEO) बनावट ई-मेल आयडी वापरून हा कोट्यवधींचा निधी स्वतःच्या वैयक्तिक खात्यात वळवला. बाणेर पोलिसांनी याप्रकरणी आरोपी कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
कौस्तुभ शिवकुमार विभुते (वय ३४, रा. फ्रेंड्स एन्क्लेव्ह सोसायटी, मुंढवा) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी योगेश सुरेश दीपांकर (वय ४४, रा. सेक्टर-२९, पीसीएनटीडीए, श्याम पॅराडाईज, रावेत/किवळे) यांनी फिर्याद दिली आहे. भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१८(४), ३१६(४), ३३६(३), ३४०(२), ३३५, ३४४, ३१९(२) माहिती तंत्रज्ञान कायदा २००० कलम ६५, ६६(सी), ६६(डी) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हा आर्थिक घोटाळा ११ जून २०२४ ते ३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत कंपनीच्या बालेवाडी येथील कॉर्पोरेट कार्यालयात सुरू होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कौस्तुभ विभुते हा ‘मोबिलिटी स्मार्ट सोल्यूशन्स’ कंपनीत कामाला होता. त्याच्यावर कंपनीच्या निधी आणि आर्थिक व्यवहारांची मोठी जबाबदारी व विश्वास होता. मात्र, त्याने आर्थिक अपहार करण्याच्या हेतूने नियोजनबद्ध कट रचला. आरोपीने मूळ विक्रेत्यांची (Vendors) नावे आणि बिलाचे क्रमांक तेच ठेवले. मात्र, ईआरपी (ERP) सिस्टीममधील नोंदी आणि पेमेंट तपशीलात बदल करून बँक खाते क्रमांक, लाभार्थीचे नाव आणि IFSC कोड स्वतःच्या व स्वतःशी संबंधित खात्यांचा टाकला. यामुळे बिल मूळ विक्रेत्याचेच वाटायचे, पण पैसे आरोपीच्या खात्यात जमा व्हायचे.
पेमेंट मंजुरीबाबत कोणाला शंका येऊ नये म्हणून आरोपी कौस्तुभने कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचा (CEO) हुबेहूब दिसणारा बनावट ई-मेल आयडी तयार केला. “हे पेमेंट तातडीने अदा करण्यात यावे,” असे बनावट ई-मेल तो कंपनीच्या संबंधित वित्त विभागाला पाठवायचा. CEO च्या ई-मेलवर विश्वास ठेवून आणि ईआरपीमधील बनावट नोंदींच्या आधारे कंपनीच्या वित्त विभागाने कोणत्याही स्वतंत्र पडताळणीशिवाय आरोपीने दिलेल्या सूचनांनुसार कोट्यवधी रुपये अदा केले. आरोपीने दोन वर्षांच्या काळात तब्बल २ कोटी ४५ लाख ३६ हजार ५८४ रुपये स्वतःच्या वैयक्तिक खात्यात वर्ग करून घेतले.
कंपनीच्या वार्षिक आर्थिक पाहणी आणि अंतर्गत ऑडिटदरम्यान (Internal Audit) बिलांच्या पडताळणीत मोठी तफावत आढळून आली. मूळ विक्रेत्यांना पैसे न पोहोचता ते इतरच खात्यांवर वर्ग झाल्याचे आणि CEO चे ई-मेल बनावट असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर कंपनीचे प्रतिनिधी योगेश दीपांकर यांनी तातडीने बाणेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.



