
सचिन दोडके यांच्या कार्यक्रमाचे विनापरवाना आयोजन
वारजे पोलीस ठाण्यात निवडणूक आयोगाकडून तक्रार
पुणे : प्रचारासाठी विनापरवाना सभा आणि स्नेहभोजनाचे आयोजन करून आचार संहिता भंग केल्याप्रकरणी खडकवासला विधानसभा मतदारसंघामधील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पार्टीच्या कार्यकर्त्यांवर वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे (शप) उमेदवार सचिन दोडके यांच्या प्रचारासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाच्या वतीने तक्रार देण्यात आली आहे.
रोहन ज्ञानोबा धावडे, संजय उर्फ बाबू दोडके, अजय पोळ (तिघे रा. वारजे माळवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी भरारी पथकातील समन्वय अधिकारी राहुल साळुंखे यांनी फिर्याद दिली आहे. राष्ट्रवादीचे (शप) उमेदवार सचिन दोडके यांच्या प्रचारासाठी चांदणी लॉन येथे रविवारी (१० नोव्हेंबर) कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याठिकाणी परवानगी न घेता सभा आणि स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे निमंत्रण सोशल मीडियाच्या माध्यमातून देण्यात आले होते.
‘वारजेकरांचा निर्धार, सचिनभाऊ दोडकेच आमदार’, असे फलक देखील याठिकाणी लावण्यात आले होते. विनापरवानगी कार्यक्रम घेऊन आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी धावडे, दोडके, पोळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खडकवासला मतदारसंघात आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी यापूर्वी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.