

वडिलोपार्जित जमिनीच्या बनावट कागदपत्रांचा केला वापर
पुणे : वडिलोपार्जित जागेची बनावट कागदपत्रे तयार करून बँकेमधून लाखो रुपयांचे कर्ज घेऊन फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या ठगवणूकीत बँकेच्या अधिकाऱ्यांनाही सहभागी करून घेण्यात आले. याप्रकरणी मार्केटयार्ड येथील सीएसबी बँकेच्या अधिकारी/ कर्मचारी यांच्यासह एकूण पाच जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हा प्रकार २०२२ ते २०२४ पर्यंत घडला.
अनिल तुकाराम मोहिते, सुरेश तुकाराम मोहिते, राकेश सुदाम पारखी, विरेंद्र राजू मोहिते, सिएसबी बँकेतील/बँकेशी संबंधीत अधिकारी/ कर्मचारी व या सर्वांना सहाय्य करणारे इतर यांच्यावर भा.दं.वि.क. ४२०, ४०६, ४६७, ४६८, ४६९, ४७१, ४७२, ४७३, ४७४, ४०९, ३४ सह नोंदणी अधिनियम १९०८ चे कलम ८२ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
फिर्यादी यांची मुळशी तालुक्यात मौजे माण येथील गट नं. ४०० मध्ये वडिलोपार्जीत अविभक्त मिळकत आहे. फिर्यादी यांच्या वडिलांची बनावट सही व अंगठ्याचे ठसे उमठवून बनावट वाटणीपत्र, बनावट भाडे करारनामा, बनावट भोगवटा पत्र, बनावट कलेक्टर बिनशेती आदेश, बनावट शिक्के तयार करण्यात आले.
या कागदपत्रांचा वापर करून वडिलोपार्जीत अविभक्त मिळकत स्वतःची असल्याची भासवले. तसेच बांधकाम असल्याचे खोटे दाखवून सर्व बनावट कागदपत्रं नोंदणीकृत करुन सीएसबी बँकेच्या मार्केटयार्ड शाखेत सादर करुन त्यावर कर्ज घेण्यात आले. फिर्यादी यांची वडिलोपार्जित संयुक्त व अविभक्त मिळकत धोक्यात आणून फसवणुक केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.







