
फटाके उडविण्यावरुन झालेल्या वादात जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यु
रामटेकडी येथील घटनेत खुनाचा गुन्हा दाखल करुन एकाला अटक
पुणे : लक्ष्मी पुजनानंतर फटाके उडविताना चायनीज गाडीकडे फटाके फेकू नको, या कारणावरुन दोन गटात झालेल्या भांडणात जखमी झालेल्या एका तरुणाचा शुक्रवारी पहाटे मृत्यु झाला. पोलिसांनी अगोदर मारामारीचा गुन्हा दाखल केला होता. आता त्यात खुनाचे कलम वाढविण्यात आले आहे.
जितेंद्र परमेश्वर ठोसर (वय ३५, रा. रामटेकडी, हडपसर) असे मृत्यु पावलेल्या तरुणाचे नाव आहे.
रामटेकडी येथील पिवळा चौकातील निजा चायनीज सेंटरवर २१ ऑक्टोंबर रोजी रात्री साडेनऊ वाजता ही घटना घडली होती.
याबाबत प्राजक्ता अविनाश देडगे (वय २५, रा. मगरीनबाई चाळ, रामटेकडी, हडपसर) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी खन्नासिंग अजितसिंग कल्याणी (वय ४५, रा. साईमंदिर रामटेकडी) याला अटक केली आहे. त्याचे साथीदार लकीसिंग जल्लुसिंग, जस्सुसिंग, अर्जनसिंग, गोविंदसिंग व इतरांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाचा यश विश्वजीत ठोसर (वय ३०) हा पिवळा चौकात निंजा चायनीज हातगाडी लावतात. त्यांच्या हातगाड्यावर लक्ष्मी पुजा करण्यासाठी नंणद अनिता विश्वजीत ठोसर, अश्विनी जितेंद्र ठोसर, भाऊ जितेंद्र परमेश्वर ठोसर, विश्वजीत परमेश्वर ठोसर, भाचा वंश विश्वजीत ठोसर हे जमले होते. त्यांच्या ओळखीचा लक्किसिंग खन्नासिंग कल्याणी हा पिवळा चौक येथून पेटते फटाके हाताने त्यांच्या चायनीज दुकानाचे दिशेने फेकत होता. त्यावेळी पेटता फटाका त्याने त्यांच्या चायनीज गाडीवर फेकला. तेव्हा यश ठोसर याने असे का करतो, माझ्या हातगाडीवर तेलाची कढई, गॅस सिलेंडर आहे़ तू आमच्या गाडीच्या दिशेने फटके फेकू नको, असे बोलला. त्याचा राग मनात धरुन यश याला शिवीगाळ केली. त्याचवेळी खन्नासिंग कल्याणी व इतर जण बेकादेशीर जमाव जमवून लोखंडी पाईप व धारदार शस्त्रे हातात घेऊन त्यांनी वंश ठोसर याच्या दंडावर, पाठीवर तसेच तोंडावर आणि उजवे हातावर शस्त्राने वार केले. जितेंद्र परमेश्वर ठोसर याच्या नाकावर धारदार शस्त्राने मारुन गंभीर जखमी केले. तसेच फिर्र्यादी व त्यांच्या सासु निलावती देडगे यांच्या डोक्यावर, पायावर मारुन जखमी केले. अविनाश देडगे यांच्या पाठीवर लोखंडी पाईपने मारुन गंभीर जखमी केले. उपचार सुरु असताना शुक्रवार पहाटे जितेंद्र ठोसर याचा मृत्यु झाला. वानवडी पोलिसांनी गुन्ह्यात खुनाचे कलम वाढविले आहे.
याविरोधात खन्नासिंग अजितसिंग कल्याणी (वय ४५, रा. रामटेकडी) याने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अविनाश ऊर्फ बाळा देडगे, यश ठोसर, वंश ठोसर, विश्वजीत ठोसर, यश कांबळे, दीपक देडगे, यश जगताप, जितेंद्र ठोसर, धीरज कसबे, बारीक ऊर्फ विकास कसबे (सर्व रा. रामटेकडी, हडपसर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
खन्नासिंग यांचे दोन मुलगे व पुतणे हे फटाके वाजवत होते. त्यावरुन आरोपींनी लाकडी दांडक्याने मारहाण करुन गंभीर जखमी केले. पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब वाकडे तपास करीत आहेत.



