दोन पिस्तुल बाळगणारा तरुण जेरबंद
भांडणातून जीवाच्या भितीने बाळगले होते पिस्तुल, विश्रामबाग पोलिसांनी केली अटक
पुणे : जुन्या भांडणाच्या कारणावरुन आपल्या जीवाच्या भितीने पिस्तुल बाळगणार्या तरुणाला विश्रामबाग पोलिसांनी पकडून त्याच्याकडून २ पिस्तुल व एक काडतुस जप्त केले आहे.
मयुर सचिन भोसले (वय २०, रा. पापळ वस्ती, गणपतनगर, बिबवेवाडी) असे या तरुणाचे नाव आहे.
विश्रामबाग पोलीस ठाण्याचे तपास पथकातील पोलीस अंमलदार पेट्रोलिंग करीत होते. पोलीस अंमलदार आशिष खरात व अनिस शेख यांना बातमी मिळाली की, राजेंद्रनगर येथील सार्वजनिक रोडच्या कडेला एक जण संशयितरित्या थांबलेला आहे. पोलिसांनी तेथे जाऊन थांबलेल्या मयुर भोसले याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे १ लाख रुपयांचे दोन गावठी पिस्तुल व एक काडतुस मिळून आले. विश्रामबाग पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध आर्म अॅक्टखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर तपास करीत आहेत.
मयुर भोसले याची काही दिवसांपूर्वी भांडणे झाली होती. त्या भांडणाच्या कारणावरुन आपल्यावर विरोधी टोळीतील लोक हल्ला करतील, अशी त्याला भिती वाटत होती. त्यातूनच जीवाच्या भितीने पिस्तुल बाळगल्याचे त्याचे म्हणणे आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले, सहायक पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदिप कसबे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अरुण घोडके यांच्या सुचनेप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर, पोलीस अंमलदार सचिन कदम, गणेश काठे, शैलेश सुर्वे, सचिन अहिवळे, अमोल भोसले, जाकीर मणियार, आशिष खरात, अर्जुन थोरात, राहुल मोरे, अनिस शेख, नितीन बाबर, सागर मोरे, शिवा गायकवाड, राहुल माळी यांनी केली आहे.



