
तरुणाने ‘एक्स’वर पोस्ट करीत दिली घडलेल्या प्रकाराची माहिती
पुणे | प्रतिनिधी : एका तरुणाने ‘एक्स’वर पोस्ट करीत आपल्यासोबत घडलेला पोलिसांचा एक प्रसंग कथन केला आहे. या तरुणाने पोलिसांचे आभार मानले असून त्यांच्या कर्तव्यदक्षतेबाबत धन्यवाद दिले आहेत.
तर, घडलेली घटना अशी, की दिप्तेश राऊत या तरुणाचा पुणे विमानतळावर लॅपटॉप हरवला होता. हि घटना १८ जुलै रोजी घडली होती. याबाबत राऊत यांनी पोलिसांकडे तक्रार दिलेली होती. पोलीस देखील या चोरीचा तपास करीत होते. लॅपटॉपमध्ये महत्वाचा डाटा आणि कागदपत्रे असल्याने राऊत चिंतेत होते.
त्यांना २३ जुलै रोजी पोलिसांनी फोन करून पोलीस ठाण्यात बोलावले. पोलीस ठाण्यात गेल्यावर त्यांना सुखद धक्का बसला. पोलिसांनी त्यांचा लॅपटॉप शोधुन आणलेला होता. हा लॅपटॉप त्यांना पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुपूर्द केला. पोलिसांचे हे रूप पाहून दिप्तेश राऊत सुखावले.
याबाबत ‘एक्स’वर पोस्ट करताना राऊत म्हणाले, की पोलिसांची समर्पितवृत्ती, प्रामाणिकपणा आणि न थकता केलेले प्रयत्न यामुळेच हे होऊ शकले. आपल्या कर्तव्याला सलाम असून आपण खाकी वर्दीमधील खरे हिरो आहात. व्यवस्थेवर आमचा विश्वास दृढ करण्यासाठी हि घटना महत्वपूर्ण ठरली असेही त्यांनी नमूद केले आहे. विशेष म्हणजे पुणे पोलिसांच्या एक्स वर देखील त्यांच्या पोस्टचा स्क्रीनशॉट पोस्ट करण्यात आला आहे.