
फटाके उडविण्यावरुन महिलेच्या डोक्यात बाटली मारुन केले जखमी
औंध येथील घटनेत चतु:श्रृंगी पोलिसांनी तिघांना केली अटक
पुणे : लहान मुले फटाके उडवत असताना “मी सांगितल्याशिवाय बिल्डिंगमध्ये फटाके वाजवायचे नाही” असे म्हणून महिलेच्या डोक्यात बाटली फोडून तिला लाकडी बांबुने मारहाण करुन गंभीर जखमी करण्यात आले. चतु:श्रृंगी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
याबाबत साक्षी गणेश थरकर (वय २५, रा. नारळीकर बिल्डिंग, नागरस रोड, औंध) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी टक्या कसबे (वय २७), रितीक कसबे (वय २६), पुजा चव्हाण (वय ३०, तिघे रा. नारळीकर बिल्डिंग, नागरस रोड, औंध) यांना अटक केली आहे. हा प्रकार नारळीकर बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये २१ ऑक्टोंबर रोजी रात्री पावणेबारा वाजता घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साक्षी थरकर या टॅटू आर्टिस्ट असून घरातून टॅटूचा व्यवसाय करतात. त्या दोन लहान मुलांसह आईकडे राहतात. लक्ष्मीपुजन केल्यानंतर रात्री ते सर्व जण पार्किंगमध्ये फटाके उडवत होते. त्यावेळी त्यांच्या बिल्डिंगमधील टक्या कसबे तेथे आला. तो म्हणाला की, मी सांगितल्याशिवाय बिल्डिंगमध्ये कोणीही फटाके वाजवायचे नाहीत, असे म्हणून त्याने साक्षी यांच्या डोक्यात तेथे पडलेली बाटली मारुन जखमी केले. त्या ओरडल्या असता त्यांची आई सोडवण्यासाठी आली. तेव्हा पुजा चव्हाण हिने साक्षी हिचे केस धरुन खाली पाडून हाताने मारहाण केली. रितीक कसबे याने तेथे पडलेला लाकडी बांबु डोक्याच्या मागे मारुन जखमी केले. त्यांच्या आई व वहिनीने त्यांना औंध हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले. त्यानंतर त्यांनी फिर्याद दिली असून पोलीस हवालदार कोळी तपास करीत आहेत.


