
पुणे : हिवाळ्याची सुरुवात होत असल्याने हवामानात गारवा वाढला आहे. या काळात सर्दी, खोकला, ताप, फ्लू, अस्थमा, सायनस, तसेच हृदयविकार व संधिवात यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे सर्व नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन पुणे महापालिकेच्या मेट्रपॉलिटन युनिटकडून करण्यात आले आहे. याबाबतच्या मार्गदर्शक सूचना आरोग्य अधिकारी डॉ. निना बोराडे, तसेच ऑफिस इनचार्ज एमएसयु तथा सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली जाधव यांनी केले आहे.
१. उबदार कपडे परिधान करावेत स्वेटर, शाल, मफलर, मोजे व टोपी इत्यादींचा वापर करावा.
२. गरम अन्न व पेये घ्यावीत सूप, हळदीचे दूध, गरम पाणी पिण्याची सवय ठेवावी. थंड पेये, आईस्क्रीम व बर्फाचे पदार्थ खाणे टाळावे.
३. संतुलित आहार घ्यावा – हंगामी फळे, ताज्या भाज्या, सुका मेवा, गूळ, तीळ व स्निग्ध पदार्थांचा आहारात समावेश करावा.
४. पुरेशी झोप घ्यावी व व्यायाम करावा सकाळच्या कोवळ्या उन्हात थोडा वेळ बसणे फायदेशीर ठरते तसेच रोज व्यायाम करावा.
५. सार्वजनिक ठिकाणी धुंकू नका.
६. वैयक्तिक स्वच्छता पाळावी हात वारंवार धुवावेत, खोकतांना वा शिंकताना रुमालाचा वापर करावा.
७. त्वचेची काळजी घ्यावी त्वचेचा कोरडेपणा टाळण्यासाठी त्वचेवर तेल किंवा मॉइश्चरायझर लावावे.
८. धूम्रपान टाळावे – धूम्रपान केल्यास श्वसनासंबंधी आजाराचा धोका वाढतो.
९. लसीकरण – फ्लू किंवा इन्फ्लूएंझा आजारांपासून बचाव करण्याकरिता डॉक्टरांच्या सल्याने लस घ्यावी.
१०. वृद्ध, गरोदर माता, लहान मुले, सहव्याधी असणाऱ्या व दीर्घकालीन आजार असलेल्या व्यक्तींची विशेष काळजी घ्यावी.
११. सर्दी, ताप, खोकला, घश्यात खवखव, धाप लागणे, अंगदुखी, इत्यादी लक्षणे असलेल्या रुग्णांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे तसेच गर्दीच्या ठिकाणी जावयाचे असल्यास मास्कचा वापर करावा.
१२. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही (प्रतिजैवक किंवा इतर) औषध घेऊ नका.
१३. जर लक्षणे वाढली तर, जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा (जास्त ताप, श्वास घेण्यास त्रास, त्वचा किंवा ओठ निळसर रंगाचे होणे, थुंकीत रक्त किंवा वर्तणुकीत बदल, लहान मुलांना ताप, चिडचिडेपणा, किंवा द्रव आणि अन्न नाकारल्यास, त्यांना ताबडतोब रुग्णालयात घेऊन जा).
हिवाळ्यात आरोग्य चांगले ठेवण्यासाठी या साध्या पण महत्त्वाच्या सूचना पाळणे गरजेचे आहे. नागरिकांनी स्वतःची व आपल्या कुटुंबियांची काळजी घ्यावी.







