
तात्पुरत्या स्वरूपात वाहतुकीमध्ये बदल
पुणे : गोळीबार मैदान चौकात सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाय शोधला जाणार आहे. ही कोंडी सोडविण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर या चौकातील वाहतुकीमध्ये बदल केले जाणार आहेत. वाहतूक पोलिसांकडून बुधवारपासून (२७ नोव्हेंबर) या बदलांची अंमलबजावणी केली जाणार आहे.
वाहतूक पोलिसांच्या माहितीनुसार, पुणे-सोलापूर रस्त्यावरील गोळीबार मैदान चौकात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. हा चौक मुळातच अरुंद आहे. या चौकाला कोंढवा आणि स्वारगेट कडून येणारे रस्ते जोडतात. तसेच, या चौकातून कॅम्प परिसर आणि स्वारगेट, कोंढवा याठिकाणी जाणारे रस्ते येऊन मिळतात. वाहनांची वर्दळ अधिक असल्याने या भागात वाहतूक कोंडीची समस्या वाढली आहे. ही कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल केले जाणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली.
सोलापूर रस्ता, तसेच पूलगेटकडून गोळीबार मैदान चौकातून डावीकडे वळून रक्षा लेखा नियंत्रक कार्यालय (सीडीओ) चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना मनाई करण्यात आली आहे. सीडीओ कार्यालय चौकाकडे जाणाऱ्या वाहनांनी सोलापूर बाजार, नेपीयर रस्ता, खटाव बंगल्यामार्गे सीडीओ चौकाकडे जावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.