
नव्या चेहऱ्यांना मिळणार संधी : निष्ठावंतांचा विचार केला जाणार असल्याची चर्चा
लक्ष्मण मोरे
पुणे : महापालिका निवडणुकांचे बिगुल फुंकले गेले आहे. नुकतीच प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. आता आरक्षण सोडतीची प्रतीक्षा इच्छुकांना लागलेली आहे. मागील तीन वर्षांपासून निवडणुकांची वाट पाहणाऱ्या इच्छुकांची धाकधूक वाढविणारी बातमी भाजपाच्या गोटातून समोर आली आहे. यंदाच्या तिकीट वाटपामध्ये भाजपाकडून ३० टक्के ‘माननियां’ना नारळ देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. संभाव्य उमेदवारांची चाचपणी पक्षाकडून सुरू करण्यात आली असून या माननियांऐवजी नव्या चेहऱ्यांना आणि निष्ठावंतांना संधी देण्याचा विचार प्रकर्षाने केला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. केवळ ‘इलेक्टीव्ह मेरीट’चाच विचार न करता उमेदवारांची प्रतिमा हा देखील महत्वाचा मुद्दा असणार आहे.
पुणे महापालिका २०२२ साली विसर्जित करण्यात आली होती. त्यानंतर, साधारण तीन वर्षांपासून निवडणुकांची प्रतीक्षा लागलेली आहे. इच्छुकांचे खर्च करून करून कंबरडे मोडण्याची वेळ आली. राजकीय आशीर्वादाने तग धरून असलेल्या ठेकेदार समूहात देखील प्रचंड स्पर्धा आणि चढाओढ पाहायला मिळत आहे. शहराच्या विकासासंबंधीचे अनेक विषय प्रलंबित रहात असल्याची ओरड माजी नगरसेवक आणि इच्छुकांकडून सतत होत होती. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये भाजपाला मिळालेल्या यशामुळे पुन्हा एकदा ‘चैतन्य’ निर्माण झाले आहे.
भाजपाकडून सातत्याने पक्ष संघटन, विस्तार आणि राजकीय यश याविषयी ‘मंथन’ करण्यात येते. आता कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. भाजपाची बलस्थाने असलेल्या हजारी प्रमुख, पन्ना प्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख अशा पदाधिकाऱ्यांच्या बैठका सुरू झालेल्या आहेत. संभाव्य उमेदवार कोण असू शकतो याविषयी चर्चा देखील पक्षात सुरू झालेल्या आहेत. विशेष म्हणजे, विविध प्रभागांमध्ये दुसऱ्या फळीमधील अनेक तरुण कार्यकर्ते उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. मागील १५-२० वर्षांपासून नगरसेवक पदावर विराजमान असलेल्या चेहऱ्यांना यावेळी विराम देऊन नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची मागणी प्रकर्षाने पुढे येऊ लागली आहे.
दुसरीकडे प्रभागांची रचना बदलण्यात आल्याने विधानसभांच्या सीमांवर असलेल्या प्रभागांमधील इच्छुकांची/माजी नगरसेवकांचे पुनर्वसन कुठे करायचे असा देखील एक पेच निर्माण झाला आहे. अनेक प्रभाग तुटले आहेत. भाजपाच्या माजी नगरसेवकांचे अथवा इच्छुकांचे देखील हक्काचे मतदार विभागले गेले आहेत. एका विधानसभा क्षेत्रातील भाग दुसऱ्या विधानसभा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर गेल्याने अडचण निर्माण झाली आहे. कारण, आता आपल्या विधानसभेच्या आमदारापेक्षा दुसऱ्या विधानसभेच्या आमदाराकडे जाऊन विणवण्या कराव्या लागणार आहेत. तर, या आमदारांना आपल्या क्षेत्रातील इच्छुकांना न्याय द्यायचा की दुसऱ्या मतदार संघातून आलेल्या नव्या इच्छुकाना उमेदवारी द्यायची याविषयी देखील खल करावा लागणार आहे. समविष्ट गांवांमधील चित्र देखील फारसे वेगळे असणार नाही. त्यामुळे नेत्यांची मोठी कसरत होणार असल्याचे चित्र आहे.
काही उमेदवारांच्या बाबतीत पक्षामध्येच नाराजी आहे. काही ‘माननीय’ आपला ‘मान’ पक्षापेक्षा अधिक असल्याचे मानतात. तर, काही माजी नगरसेवकांनी विधानसभा निवडणुकांच्या काळात राष्ट्रवादी, शिवसेना आदी पक्षांचा पर्याय तपासून पाहिलेला होता. त्या पक्षांच्या काही नेत्यांच्या भेटीगाठी देखील घेतलेल्या होत्या. त्यांची जंत्री पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी तयार केली आहे. यासोबतच, कार्यक्षम नसलेल्या तसेच आपल्या नगरसेवक पदाच्या काळात फारशी छाप न पाडू शकलेल्या चेहऱ्यांना यंदा संधी नाकारली जाण्याची शक्यता आहे. त्यांचे ट्रॅक रेकॉर्ड तपासले जात आहे. त्याऐवजी निष्ठावंत आणि वैचारिकदृष्ट्या पक्क्या असलेल्या लोकांना संधी दिली जावी असा एक मतप्रवाह आहे. काही आमदारांची मुले देखील यंदाच्या उमेदवारांच्या यादीमध्ये दिसू शकतात.
पुणे भाजपाकडे सध्यातरी सर्वमान्य नेतृत्व नाही. उच्च शिक्षण व तंत्रज्ञान मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यमंत्री माधुरी मिसाळ ही दोन नावे मातब्बर मानली जातात. यासोबतच शहराध्यक्ष म्हणून धीरज घाटे, आमदार डॉ. सिद्धार्थ शिरोळे, सुनील कांबळे, भीमराव तापकीर यांच्यासह विधानपरिषदेचे आमदार योगेश टिळेकर हे देखील आपले वजन राखून आहेत. यासोबतच, गणेश बीडकर, श्रीनाथ भिमाले आदी नेते देखील आपला शब्द राखला जावा याकरिता धडपडतील. मात्र, या नेत्यांच्या संपर्कात असतानाही अनेक माजी नगरसेवक थेट राज्याच्या शीर्षस्थ नेतृत्वाच्या संपर्कात आहेत. अनेकदा मुंबईला जाऊन आपली कैफियत असो वा गाऱ्हाणी त्यांनी मांडलेली आहेत.
तूर्तास, महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने आपली उमेदवारी पक्की करण्यासाठी अनेकांची धावपळ सुरू आहे. कार्य अहवाल, पत्रके छापणे, सोशल मिडियाचे नियोजन, मंडळे, सोसायटया, संस्था आदींच्या भेटीगाठी देखील सुरू करण्यात आल्या आहेत. महायुती एकत्र लढणार की वेगवेगळे लढणार याविषयाची फारशी चिंता न करता भाजपाचे संभाव्य इच्छुक कामाला लागले आहेत. मात्र, यातील किती जणांच्या इच्छा सुफळ संपूर्ण होणार हे आगामी काळातच समजेल.