
प्रशांत रणदिवे यांचा गौरव सोहळा : ब्रिटिश सरकारच्या चेव्हेनिंग विद्यापीठाची मिळविली स्कॉलरशिप
पुणे : गुलमोहर वर्ल्ड फाउंडेशनच्यावतीने मातंग समाजातील होतकरू विद्यार्थी प्रशांत रणदिवे यांचा गौरव व शुभेच्छा सोहळा नुकताच पुण्यात संपन्न झाला.
प्रशांत रणदिवे यांनी अत्यंत परिश्रम घेऊन प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जगामध्ये प्रतिष्ठेची समजली जाणारी ब्रिटिश सरकारच्या चेव्हेनिंग विद्यापीठाची स्कॉलरशिप मिळवली. त्याबद्दल पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी त्यांचा फाऊंडेशनच्यावतीने लॅपटॉप भेट देऊन गौरव करण्यात आला.
हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कलादालन, पुणे येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फाऊंडेशनचे अध्यक्ष अनिल हातागळे होते. कार्यक्रमाचे आयोजन संस्थेच्या संचालिका जयश्री हातागळे यांनी केले. या वेळी मातंग समाजातील ज्येष्ठ साहित्यिक सुरेश पाटोळे, संपत जाधव, लक्ष्मी पवार, ॲड. राजश्री अडसूळ, शंकर शेंडगे, गणेश कांबळे, प्रभाकर ढावरे, डॉ. नारायण डोलारे, माजी नगरसेवक मनिष साळुंके, ॲड. महेश सकट आदी अनेक मान्यवर, कार्यकर्ते व प्रशांत यांची वाटचाल प्रेरणादायी मानणारे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रशांत रणदिवे यांनी आपल्या भाषणात उच्च शिक्षणाचे महत्त्व, मातंग समाजाची सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक परिस्थिती, तसेच भविष्यात संस्थात्मक बांधणीची गरज यावर मार्मिक भाष्य केले. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी युवकांनी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे आभार मानले. भविष्यात आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. हा कार्यक्रम मातंग समाजाच्या प्रगतीसाठी एक सकारात्मक पाऊल ठरला असून, इतर विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणास्त्रोत ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमर चव्हाण व आभार प्रदर्शन प्रकाश साठे यांनी मानले.