
दोन विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल : तीन महिन्यात घडली दुसरी घटना
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहात पुन्हा एकदा गांजा सापडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पुणे विद्यापीठ प्रशासनाने दोन विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. विद्यापीठाच्या वसतिगृह आणि सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. तीन महिन्यात दुसरी घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
विद्यापीठाच्या वसतिगृह क्रमांक पाचमधील एका खोलीत विद्यार्थी गांजा ओढत असल्याची तक्रार एका विद्यार्थ्याने सुरक्षा विभागाकडे केली होती. त्यानुसार सुरक्षा विभागातील कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष जाऊन घटनेची पाहणी केली. विद्यार्थ्याने केलेल्या तक्रारीनुसार सुरक्षा विभागाने तक्रारदार विद्यार्थी आणि गांजा ओढत असलेल्या दोन विद्यार्थ्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाकडून चतु:शृंगी पोलीस ठाण्यात दोन विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विद्यापीठाच्या कुलसचिव डॉ. ज्योती भाकरे म्हणाल्या, की वसतिगृहाचे गृहपाल यांच्याकडून संबंधित प्रकरण पोलिसांकडे दाखल करण्यात आले. पुढील कार्यवाही पोलिसांकडून करण्यात येत आहे. संबंधित विद्यार्थी विद्यापीठाच्या वसतिगृहामध्ये प्रवेशित नाही.