
आमदार बापू पठारेंकडून इच्छुकांच्या मुलाखती; चिरंजीव सुरेंद्र यांची मात्र पाठ
पुणे : राजकारण दिसते तेवढे सोपे आणि सरळ कधीच नसते. राजकीय महत्वाकांक्षा अनेकदा नात्यांना देखील बगल देते. याची प्रचिती मागील काही वर्षात घडलेल्या राजकीय उलथापालथीमधून आलेलीच आहे. असेच, काहीसे चित्र गुरुवारी वडगाव शेरी मतदार संघात पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचन्द्र पवार) पक्षाकडून इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती सुरु करण्यात आल्या आहेत. वडगाव शेरी मतदार संघाचे आणि शहरातील पक्षाचे एकमेव आमदार बापू पठारे यांच्यासह खासदार एड. वंदना चव्हाण, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते अंकुश काकडे, एड. जयदेव गायकवाड आदींनी या मुलाखती घेतल्या. आमदार पठारे यांच्या नात्यातील काही इच्छूकांसह अनेकांनी मुलाखती दिल्या. मात्र, त्यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे यांनी या मुलाखतींकडे पाठ फिरवल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे सुरेंद्र यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.
महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजले असून सर्वच राजकीय पक्षांनी इच्छुकांना अर्ज दिले आहेत. अर्ज सादर केल्यानंतर आता प्रत्यक्ष मुलाखती देखील सुरु झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचन्द्र पवार) पक्षाकडून देखील मुलाखती घेतल्या जात आहेत. आज दिवसभरात शहरातील सर्वच मतदार संघातील इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या. प्रत्येक मतदार वडगाव शेरी मतदार संघामधील इच्छूक उमेदवारांच्या मुलाखतींना देखील सुरुवात झाली आहे. गुरुवारी पक्षाच्या कार्यालयात या मतदार संघातील इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या. यावेळी आमदार बापू पठारे यांचे पुतणे आणि माजी नगरसेवक महेंद्र पठारे, भाचे संतोष भरणे, भावजय तथा माजी नगरसेविका सुमन पठारे, माजी नगरसेवक एड. भैय्यासाहेब जाधव आदींनी मुलाखती दिल्या. मात्र, प्रभाग क्रमांक तीनमधून इच्छुक असलेले आमदार पठारे यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे यांनी मात्र या मुलाखतींकडे पाठ फिरवली.
सुरेंद्र पठारे यांनी मागील अनेक महिन्यांपासून मतदारांच्या भेटीगाठी सुरु केल्या होत्या. त्यांनी ‘पीआर’ वाढवीत प्रसिद्धीवरही भर दिल्याचे पहायला मिळाले. विधानसभा निवडणुकीत वडिलांच्या विजयासाठी झटलेले आणि नियोजन केलेले सुरेंद्र भाजपात जाणार असल्याच्या चर्चा मागील काही महिन्यांपासून शहरात सुरु आहेत. त्यांच्यासह काही माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते देखील भाजपात जातील अशी अटकळ बांधली जात आहे. सुरेंद्र हे स्वतः निवडणूक लढविण्यास इच्छूक आहेत. मात्र, त्यांनी वडील ज्या पक्षाचे आमदार आहेत त्या पक्षाची मुलाखत देण्यास मात्र टाळाटाळ केल्याचे पाहायला मिळाले. सुरेंद्र यांनी मुलाखतीकडे पाठ फिरवल्यामुळे मतदार संघात त्यांच्य्या भाजपा प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. त्यांच्या अनुपस्थितीचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, या घटनेमुळे वडगाव शेरीच्या राजकीय वर्तुळात हा विषय चर्चेला कारणीभूत ठरला आहे. जर सुरेन्द्र पठारे भाजपात गेले आणि त्यांनी निवडणूक लढविळी तर आमदार बापूसाहेब पठारे यांची अडचण होणार आहे. मुलाच्या विजयासाठी प्रयत्न करायचे की स्वपक्षाच्या उमेदवारासाठी झटायचे असा पेच त्यांच्यासमोर निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र, वस्तुस्थिती स्पष्ट होण्याकरिता आणखी काही काळ वाट पहावी लागणार आहे. तूर्तास वडगाव शेरीच्या राजकीय आखाड्यात रंगत चढू लागल्याचे दिसत आहे.







