
कटात महिलांचा देखील समावेश : खंडणी विरोधी पथक एककडून ‘शूटर’ला अटक; एक पिस्तूल जप्त
पुणे : गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक क्रमांक एकच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एका तरुणाचा संभाव्य खून रोखण्यात यश मिळवले असून खून करण्याची सुपारी देण्यात आलेल्या ‘शूटर’ला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून एक बेकायदा पिस्तूल आणि काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. या शूटरला पैसे आणि पिस्तूल पुरवण्यात आले. या कटामध्ये महिलांचा देखील समावेश असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.
चेतन ऊर्फ बाळ्या सिध्दनाथ जाधव (वय २६ रा. स. नं. १३०, दांडेकर पुल, सिंहगड रोड) असे अटक आरोपी शूटरचे नाव आहे. याप्रकरणी सिंधु धोत्रे ऊर्फ आक्का झरेकर, अमन झरेकर, त्याची आई सिन्नु झरेकर, गणेश रेणुसे, त्याची आई पिंकी रेणुसे (सर्व रा. स. नं. १३२, महालक्ष्मी बिल्डींग, सिंहगड रोड, दत्तवाडी), सुमित माने (रा. हडपसर), निशांत राऊत (रा. अप्पर, बिबवेवाडी), बापू कांबळे (रा. अप्पर, बिबवेवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार अमर आनंदराव पवार यांनी फिर्याद दिली आहे. भान्यासं कलम ५५, आर्म्स अॅक्ट कलम ३(२५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१) सह १३५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. बाळ्या जाधवकडून एक काळ्या रंगाचे देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी एका तरूणाच्या खुनाचा कट रचला होता. या तरूणावर २०२४ साली पूर्ववैमनस्यामधून प्राणघातक हल्ला झाला होता. त्यावेळी हा तरुण बचावला. याप्रकरणी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या आरोपींमध्ये गणेश रेणुसे याचाही समावेश होता. या हल्ल्यातील आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेली होती. तेव्हापासून सर्व आरोपी कारागृहात बंद होते. गणेश रेणुसे याला याप्रकरणात नुकताच जामीन मिळाला. तो कारागृहाबाहेर आल्यानंतर हल्ला झालेला तरुण आपल्यावर पलटवार करेल अशी भीती गणेश आणि त्याच्या नातेवाईकांना वाटत होती.
त्यामुळे त्यांनी त्या तरुणाचा खून करण्याचा कट रचला. थेट आपल्यावर संशय येऊ नये याकरिता आरोपींनी बाळ्या जाधव याला सुपारी दिली. त्याला पिस्तूल आणि काडतुसे पुरवली. पोलिसांच्या माहितीनुसार, आक्का झरेकर, सिन्नु झरेकर, पिंकी रेणुसे, गणेश रेणुसे, अमन झरेकर, सुमित माने, निशांत राऊत आणि बापू कांबळे यांनी हा खून करण्यासाठी आरोपीला पिस्तूल व जिवंत काडतुसे पुरवून सहाय्य व प्रोत्साहन दिल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. याप्रकरणाचा तपास गुन्हे शाखेचे उपायुक्त निखिल पिंगळे, खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक विश्वजीत काइंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.





