
१५ वाहनांचे दहशत माजवित नुकसान
पुणे : शहरात सर्वसामान्य नागरिकांच्या वाहनांची तोडफोड करून नुकसान करण्याचे प्रकार सुरुच आहेत. वारजे येथील गोकुळनगर परिसरात देखील अशाच प्रकारे दहशत माजविण्यात आली. टोळक्याने याठिकाणी १५ वाहनांची तोडफोड करण्यात आली. याप्रकरणी वारजे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
बाळासाहेब धनाप्पा सोनवणे (वय ४८, रा. गुलमोहोर कॉलनी, गोकुळनगर पठार, वारजे) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे भागातील गोकुळनगर परिसरातील रहिवासी या भागातील मोकळ्या जागेत वाहने लावतात. रविवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास एक टोळके दहशत माजवित या परिसरात आले. आरडाओरडा करीत या टोळक्याने येथे लावण्यात आलेल्या मोटारी, रिक्षा, मिनी बस, टेम्पो अशा १५ वाहनांच्या काचा फोडल्या. आवाज ऐकून जागे झालेल्या रहिवाशांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला.
याबाबत स्थानिक नागरिकांनी सांगितले, की वारजे आणि आसपासच्या भागात मोठ्या प्रमाणावर अवैध धंदयांचा सुळसुळाट झाला आहे. याठिकाणी रस्त्यावर अनेकदा तरुण दारू पिऊन धिंगाणा घालत असतात. या भागात गुंडांचा सुळसुळाट देखील आहे. अनेकदा वर्चस्वाच्या वादामधून भांडणे आणि हाणामाऱ्या होत असतात. नागरिकांनी याभागातील अवैध धंदे तातडीने बंद करावेत तसेच या भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अशी मागणी केली आहे. पोलिसांनी या भागात गस्त वाढविणे आवश्यक असून वाहनांची तोडफोड करणाऱ्यान आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे.
या विषयी बोलताना स्थानिक रहिवासी कमल राठोड म्हणाल्या, की या परिसरात मद्यपींचा धुडगूस सतत सुरू असतो. महिलांना देखील सुरक्षेची काळजी वाटू लागली आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे राठोड म्हणाल्या. तर, पोलीस उपायुक्त संभाजी कदम म्हणाले, की वाहनांची तोडफोड करणाऱ्यांची ओळख पटली आहे. दोन संशयित पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. पोलिसांची गस्त वाढविण्यात येणार असून गुन्हेगारी कारवाया करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे कदम म्हणाले.