
आयोजकावर मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे : मुंढवा परिसरातील हॉटेल पियो गार्डन येथे १७ ऑगस्ट रोजी रात्री परवानगीशिवाय फ्रेशर्स पार्टी आयोजित केल्याप्रकरणी पोलिसांनी आयोजकांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हि घटना १७ ऑगस्ट रोजी रात्री घडली होती.
फैज अली (फ्लॅट नं. १२०८, टॉवर ४२, अमनेरा गोल्ड टॉवर, हडपसर) याच्यासह अन्य सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार श्रीकांत चंद्रकांत लोंढे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “Unofficial Freshers 4.0” या नावाने पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीसाठी सुमारे ८०० ते १००० विद्यार्थी-विद्यार्थिनींना आमंत्रित करण्यात आले होते. पार्टीदरम्यान आयोजकांनी कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता मोठ्या संख्येने गर्दी केली होती.
याशिवाय, वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था न करता हॉटेलच्या परिसरातील सार्वजनिक रस्त्यावर आणि रहदारीत अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने वाहने पार्क करण्यात आली होती. पोलिसांनी दिलेल्या सूचनेनंतरही आयोजकांनी परवानगी न घेता कार्यक्रम चालू ठेवला. तसेच, परिसरातील नागरिकांनी त्याला आक्षेप घेतला. त्यावेळी वाद देखील झाला. काही काळ गोंधळ उडाला होता.




