जगभरातील एकूण सहा जणांना पुरस्कार जाहीर
पुणे : युनायटेड नेशन्स एन्व्हायर्न्मेंट प्रोग्रामतर्फे (यूएनईपी) सन २००५ पासून जनसमूह आणि पृथ्वीच्या संरक्षणासाठी योगदान देणाऱ्यांना या पुरस्काराने गौरवण्यात येते. प्रतिष्ठेचा समजला जाणारा हा ‘चॅम्पियन्स ऑफ द अर्थ’ जीवनगौरव पुरस्कार यंदा ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांना जाहीर करण्यात आला आहे. जगभरातील एकूण सहा जणांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. ‘चॅम्पियन्स ऑफ द अर्थ’ हा संयुक्त राष्ट्रांचा सर्वोच्च पर्यावरण पुरस्कार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत १२२ जणांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. गाडगीळ यांनी संशोधन आणि सक्रीय लोकसहभागावर भर दिला असून त्याद्वारे पृथ्वीरक्षणासाठी उल्लेखनीय काम केले आहे. नैसर्गिक संसाधनांच्या रक्षणासंबधीचे संशोधन, धोरण आणि जनमत यावर त्यांचा कायमच प्रभाव राहिलेला आहे. राज्य आणि राष्ट्रीय धोरणांच्या परिणामांचे मूल्यमापन करून त्याची माहिती समाजातील अगदी शेवटच्या थरातील व्यक्तींपर्यंत पोचविण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. गाडगीळ यांनी पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील आणि जागतिक जैवविविधतेचे केंद्र असलेल्या पश्चिम घाट क्षेत्राबाबत फार महत्वपूर्ण काम केले आहे. ‘यूएनईपी’ने प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे.
यंदाच्या इतर पुरस्कारांमध्ये धोरण नेतृत्व विभागात ब्राझीलच्या मंत्री सोनिया ग्वाजाजारा, प्रेरणा आणि कृती विभागात रोमानिया येथील पर्यावरणप्रेमी गॅब्रिएल पॉन आणि अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील अॅमी बोवर्स कॉर्डलिस, विज्ञान आणि नवसंकल्पना विभागात चीनमधील शास्त्रज्ञ लू क्वी, उद्योजकीय दृष्टी विभागात इजिप्तमधील सेकेम यांचा पुरस्कारांमध्ये समावेश आहे.
शास्त्रज्ञ म्हणून मनापासून, वस्तुनिष्ठ पद्धतीने, तर्कशुद्ध मांडणी करत गेलो. मला लोकांमध्ये राहून काम करण्याची आवड आहे. त्यामुळे भारतभरात आदिवासी ठिकाणांपासून अनेक ठिकाणी राहिलो, फिरलो. धोरणात्मक काम करता आले. २०१३मध्ये पश्चिम घाटासंदर्भातील अहवाल लिहिला. आजवरच्या कामाचे चीज होत गेले. पुरस्कार मिळाल्याचा निश्चितच आनंद आहे.
डॉ. माधव गाडगीळ, ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ