
गुन्हे शाखेच्या युनिट तीनची कारवाई
पुणे : गुन्हे शाखेच्या युनिट तिच्या पथकाने दोन गावठी पिस्तुलांसह दोन तरुणांना जेरबंद केले. पुणे शहरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या कोंबिग ऑपरेशन दरम्यान ही कारवाई करण्यात आली.
लक्ष्मीपुत्र नागेश बडधाळ (वय २४, रा. हरितारा सोसायटी, भीम नगर, कोंडवे धावडे), राहुल राजू थोरात (रा. दत्तवाडी म्हसोबा चौक) अशी आरोपींची नावे आहेत. लक्ष्मीपुत्र बांधकाम सुपरवायझर म्हणून काम करतो. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या युनिट तीनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, पोलीस हवालदार अमित बोडरे, मोहम्मद शेख, महेंद्र तुपसौंदर आणि पोलीस शिपाई तुषार केंद्रे हे ८ ऑगस्ट रोजी पुणे शहरात अति महत्त्वाच्या व्यक्तींचे दौरे असल्याने मध्यरात्री कोंबिंग ऑपरेशन करीत होते.
या ऑपरेशन दरम्यान रेकॉर्डवरील गुन्हेगार तसेच पाहिजे आरोपींना तपासून त्यांच्यावर कारवाई सुरू होती. उत्तम नगर पोलीस ठाणे आणि पर्वती पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गस्त घालत असताना राजाराम पुलाजवळ त्यांना खबऱ्यामार्फत आरोपीबाबत माहिती मिळाली. त्याच्याकडे दोन पिस्तुले असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी कोंडवे धावडे येथील भीमनगर येथे जाऊन आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्याला ताब्यात घेऊन अंगझडती घेण्यात आली. त्याच्या कमरेच्या उजव्या बाजूला लोखंडी पिस्तूल खोचलेले आढळून आले.
त्याच्याकडे दुसऱ्या पिस्तुलाबाबत विचारणा केली असता त्याने त्याचा मित्र राहुल थोरात याच्याकडे दुसरे पिस्तुल ठेवण्यासाठी दिलेले असल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी थोरात याचा शोध घेऊन दत्तवाडीतून त्याच्याकडून दुसरे पिस्तूल ताब्यात घेतले. ही पिस्तुले नेमकी कुठून आणि कशासाठी आणली याबाबतचा तपास सुरू आहे. त्यांना पुढील कारवाईसाठी उत्तम नगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.