राजगुरूनगर येथील घटनेमुळे खळबळ : पुण्यातील लॉजमधून आरोपीला बेड्या
पुणे : अनैतिक संबंधांमधून दोन अल्पवयीन मुलींचा खून करून त्यांचे मृतदेह पाण्याच्या पिंपात लपवून ठेवण्यात आले. ही घटना राजगुरूनगर येथील वाडा रस्त्यावर घडली. खून केल्यानंतर आरोपी पुण्यात पळून आला आणि एका लॉजमध्ये लपला होता. त्याला अटक करण्यात आली आहे.
कार्तिकी सुनिल मकवाने (वय ९) आणि दुर्वा सुनिल मकवाने (वय ८) अशी खून झालेल्या मुलींची नावे आहेत. पोलिसांनी ताब्यात घेतलेला आरोपी साधारण ५० वर्षांचा आहे. आरोपी आचारी म्हणून काम करतो. मुलींवर लैंगिक अत्याचार करीत खुनाचा भयंकर प्रकार केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. या मुलींचे वडील राजगुरुनगर लगतच्या सातकरस्थळ ग्रामपंचायतीत सफाई कर्मचारी असुन पत्नी मोलमजुरी करते.
या मुली बुधवारी दुपारी घराजवळ खेळत असताना अचानक गायब झाल्या होत्या. कुटुंबीयांनी संध्याकाळी खेड पोलीस ठाण्यात त्या हरवल्याची तक्रार दिली होती. पोलिसांकडून सुरू असताना त्यांचे मृतदेह एका बियर बारजवळ काम करणाऱ्या सहा परप्रांतीय व्यक्तींच्या खोलीत सापडले. आरोपीला पोलिसांनी पहाटे चारच्या सुमारास पूण्यातील एका लॉज वरून अटक केली. खुनाचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नसले तरी अनैतिक संबंधांमधून हे खून झाल्याचे सांगीतले जात आहे.
या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संताप आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. अधिक तपशील मिळाल्यावरच पुढील माहिती स्पष्ट होईल.
पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे म्हणाले, मुलींचे मृतदेह चाळीजवळच्या खोलीत सापडले असून, गुन्ह्याचा तपास सुरू आहे. शवविच्छेदन अहवालातून पुढील माहिती मिळेल, विशेषतः अत्याचाराचा कोणता पुरावा आहे का, हे स्पष्ट होईल.