
पुणे : हवेली तालुक्यातील फुरसुंगी ग्रामपंचायत हद्दीत पुणे सासवड मार्गावरील वांजळे मळा परिसरात असलेल्या गावकरी हॉटेल जवळ सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारांस दोन दुचाकींचा समोरासमोर अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोघे जखमी झाले आहेत.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातात दुर्गेश देविदास चोरघडे (वय १८, रा. वडकी, ता. हवेली) व देशराज बलवंत सारीवान (वय २१, रा. खन्नात मॉल, पोस्ट रैतवर, ता. बजाक जिल्हा बजाक, राज्य मध्यप्रदेश) हे दोघे मृत्यूमुखी पडले आहेत. याप्रकरणी विलास सोमनाथ काळभोर (वय ६०, रा. बाजारमळा, लोणी काळभोर, ता. हवेली) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सारीवान याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विलास काळभोर हे लोणी काळभोर येथे कुटुंबासोबत राहतात. ते शेवाळवाडी येथे ट्रॅक्टरवर चालक म्हणून काम करतात. शुक्रवार (२९ नोव्हेंबर) रोजी काळभोर व त्यांचे मित्र काशीनाथ कांबळे हे दोघे कामानिमित्त दुचाकीवरून सासवड (ता. पुरंदर) येथे गेले होते. तेथील काम आटोपून ते दोघे दुचाकीवरून माघारी परतत होते. सासवड पुणे मार्गावरून सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास त्यांची दुचाकी वडकी रस्त्यावरील वांजळेमळा परिसरात असलेल्या गावकरी हॉटेल जवळ आली असता, देशराज सारीवान हा चालवीत असलेल्या दुचाकीने भरधाव वेगाने येऊन काळभोर यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या अपघातात देशराज सारीवान व त्याच्या दुचाकीच्या पाठीमागे बसलेल्या त्याचा मित्र दुर्गेश चोरघडे हे दोघे गंभीर जखमी झाले होते. तर काळभोर हे किरकोळ जखमी झाले होते. गंभीर जखमी झालेले देशराज सारीवान व दुर्गेश चोरघडे यांना हडपसर येथील नोबेल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला. जखमी काळभोर यांनी रुग्णालयातून परतले नंतर सारीवान याने त्याच्या ताब्यातील दुचाकी ही वाहतुकीचे नियमांकडे दुर्लक्ष करून, हयगयीने, अविचाराने व भरधाव वेगाने चालविले आहे. तसेच काळभोर यांच्या मोटार सायकलला समोरून धडक दिली आहे.
या अपघातात त्याच्या व दुर्गेश चोरघडे याच्या मृत्यूस कारणीभूत ठरला आहे. अशी फिर्याद विलास काळभोर यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार सारीवान याच्या विरोधात अपघातात कारणीभूत ठरल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय दंड संहिता कलम, 106 (1), 125 (अ) व 279 मोटर वाहन कायदा कलम 134 (अ) (ब) , 119/177,184 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास फुरसुंगी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विनोद पवार करीत आहेत.