
सिंहासन पूजा, अभिषेक आणि नियमित धार्मिक विधी राहणार सुरळीत
तुळजापूर, धाराशिव : महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजा भवानी मंदिरात गाभाऱ्याचे जीर्णोद्धार सुरु असून, १ ऑगस्ट ते १० ऑगस्ट या कालावधीत मुख्य गाभाऱ्यातील दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे. या दरम्यान फक्त पुजारी व सुरक्षारक्षक यांनाच गर्भगृहात प्रवेश असेल. मात्र, सिंहासन पूजा, अभिषेक आणि नियमित धार्मिक विधी हे सुरळीत सुरू राहणार आहेत.
भाविकांसाठी भवानी शंकर मंडपामधून मुखदर्शनाची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे दूरवरून येणाऱ्या भाविकांना दर्शनापासून वंचित राहावे लागणार नाही. तुळजाभवानी मंदिर हे देशातील प्रमुख शक्तिपीठांपैकी एक असून, दररोज हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी मंदिर प्रशासनाकडून दिशादर्शक फलक, सुरक्षा, पिण्याचे पाणी व गर्दी नियंत्रणासाठी स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. देवस्थान समितीने भाविकांना प्रशासनाच्या सूचना पाळण्याचे आवाहन केले असून, गर्दी टाळून शांततेत दर्शन घ्यावे, अशी विनंती केली आहे.