
FILE PHOTO: U.S. President Donald Trump signs documents as he issues executive orders and pardons for Jan. 6 defendants in the Oval Office at the White House on Inauguration Day in Washington, U.S., January 20, 2025. REUTERS/Carlos Barria/File Photo
नवी दिल्ली | दि. १८ जुलै : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दावा केला आहे की, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संभाव्य आण्विक युद्ध त्यांनी थांबवलं होतं. व्हाईट हाऊसमध्ये रिपब्लिकन खासदारांसोबत एका खासगी डिनरमध्ये बोलताना ट्रम्प म्हणाले की, “तेव्हा दोन्ही देश एकमेकांवर हल्ला करत होते आणि चार-पाच लढाऊ विमानं पाडण्यात आली होती.”
ट्रम्प म्हणाले, आम्ही बरीच युद्ध थांबवली आहेत. भारत-पाकिस्तानसारख्या दोन आण्विक शक्ती असलेल्या देशांमध्ये गोष्टी अतिशय गंभीर होत्या. विमानं हवेतून खाली पडत होती. पाच विमानं पाडली गेली होती. हे युद्ध एका नव्या स्वरूपात लढलं जात होतं. पण आम्ही ते व्यापाराच्या माध्यमातून थांबवलं. ट्रम्प यांनी दावा केला की, त्यांनी भारत आणि पाकिस्तानला सांगितले, जर तुम्ही युद्धाच्या दिशेने जात असाल, तर अमेरिका तुमच्याशी कोणताही व्यापार करणार नाही. त्यांना (भारत-पाकिस्तान) आमच्याकडून व्यापार हवा होता, पण आम्ही स्पष्ट सांगितले की, तुम्ही जर एकमेकांवर क्षेपणास्त्रं फेकत असाल तर व्यापाराचं काही होणार नाही. दोघेही आण्विक शक्ती असलेले देश आहेत.
ट्रम्प यांचा दावा आहे की त्यांच्या मध्यस्थीमुळेच हे युद्ध टळलं. त्यांनी यापूर्वीदेखील अनेक वेळा हे विधान केले आहे. ट्रम्प यांच्या या दाव्यांवर भारतातील कॉंग्रेस पक्षाने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. पक्षाने X (पूर्वीचे ट्विटर) वर लिहिलं आहे की, ट्रम्प २४ व्या वेळेस म्हणाले की त्यांनी भारत-पाकिस्तान युद्ध थांबवलं. त्यांनी हेही म्हटलं की पाच विमानं पाडली गेली होती. पण नरेंद्र मोदी यावर अजूनही मौन का बाळगून आहेत? देशाच्या सन्मानासाठी मोदींनी व्यापाराच्या बदल्यात मूकसंमती दिली का? असा सवाल कॉंग्रेसने उपस्थित केला. अमेरिकेने मध्यस्थी केली असा ट्रम्प यांचा दावा असला तरी, प्रत्यक्ष शांती प्रक्रियेची सुरुवात पाकिस्तानच्या लष्करी महासंचालकाने भारतीय समकक्षाशी संपर्क साधून केली होती. त्यांनी जमीन, आकाश आणि समुद्र या तिन्ही क्षेत्रात शत्रुत्व थांबवण्याची विनंती केली होती.
२२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाममध्ये पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ हिंदू नागरिक ठार झाले होते. त्यानंतर ७ मे रोजी भारताने “ऑपरेशन सिंदूर” अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ प्रमुख दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानने ड्रोन व क्षेपणास्त्र हल्ल्याचा प्रयत्न केला, मात्र भारतीय हवाई संरक्षण यंत्रणांनी सर्व हल्ले निष्फळ ठरवले. भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील ११ लष्करी हवाई तळांवर अचूक लक्ष्य करून कारवाया केल्या, ज्यामध्ये नूर खान आणि रहीम यार खान यांसारख्या महत्त्वाच्या तळांचा समावेश होता. भारताकडून कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र भारतीय हवाई दलाने आपल्या कारवायांची व्हिज्युअल क्लिप प्रसिद्ध करून आंतरराष्ट्रीय समुदायासमोर पुरावा मांडला होता.







