
– मान्यता मिळवणारी देशाच्या सहकार क्षेत्रातील पहिली संस्था
– केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती
पुणे : वैकुठभाई मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्था (VAMNICOM) ही त्रिभुवन सहकारी विद्यापीठाची (TSU) मान्यता मिळवणारी देशातील पहिली संस्था झाली आहे. या संस्थेत सध्या चार दीर्घकालीन पदवी आणि सहा अल्पकालीन कौशल्यवर्धित अभ्यासक्रम चालवले जातात. हे अभ्यासक्रम आता संस्थेच्या वतीने त्रिभुवन विद्यापीठाअंतर्गत चालवले जातील. पारंपारिक अभ्यासक्रमासोबतच आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाच्या सहकारातील वापरासंबंधीचे अभ्यासक्रम आता या संस्थेत शिकवले जातील. यामुळे युवकांसाठी विशेषत: ग्रामीण भागातील युवकांसाठी करीयरचे नवे दालन खुले होत आहे, अशी माहिती केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
वैकुठंभाई मेहता संस्थेच्या वतीनं सध्या कृषी व्यवसाय व्यवस्थापनाचा २ वर्षांचा पदव्युत्तर -पदविका, सहकार विषयातील २ वर्षांचा पदव्युत्तर – पदविका, सहकारी बँकिंग आणि वित्त विषयातील ४ वर्षांचा व्यवसाय प्रशासन डिग्री आणि सहकारी व्यवसाय व्यवस्थापनाचा ९ महिन्यांचा डिप्लोमा हे अभ्यासक्रम चालवले जातात. सहकाराच्या विषयांमध्ये विद्यार्थ्यांचा सैद्धांतिक पाया भक्कम करणे आणि त्यांना व्यावहारिक अनुभव प्रदान करणे हे या अभ्यासक्रमांचे उद्दिष्ट आहे.
सहकारी क्षेत्रातील विशिष्ट कौशल्य कमतरता आणि नेतृत्वाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वैकुंठभाई मेहता संस्था ६ अल्पकालीन प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालवत आहे. यामध्ये कृषी-विपणन आणि सहकारी संस्थांमध्ये मूल्यवर्धन करणे, कृषी उत्पादक संघटनांचे व्यवस्थापन आणि तंत्रज्ञांसाठी दुग्ध तंत्रज्ञान या विषयातील २ महिन्यांचे प्रमाणपत्र अभ्यासक्रमांचा समावेश आहे. कृषी उत्पादन आणि भावांचा अंदाज (Agricultural Commodities and Price Forecasting), युवा नेतृत्व आणि सामाजिक बदल (Youth Leadership and Social Change), आणि सहकारासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र (Micro-Economics for Cooperatives) या विषयांचा १ महिन्याचा अभ्यासक्रम आहे.
तरुण, तळागाळातील नेते, सहकारी संस्थांचे व्यवस्था यांच्या गरजा लक्षात घेऊन अभ्यासक्रमाची रचना व्यावहारिक अनुभव, सहकारी मूल्ये आणि आंतरविद्याशाखीय शिक्षण एकत्रित करते, ज्यामध्ये ग्रामीण विकासावर प्राथमिक लक्ष केंद्रित केले जाते. त्रिभुवन सहकारी विद्यापीठ (TSU) च्या सहकार्याने, VAMNICOM ने सहकारी परिसंस्थेतील विविध भागधारकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी हे सर्व कार्यक्रम डिझाइन केले आहेत.
भविष्यातील गरजेनुसार वैकुंठभाई मेहता संस्थेने डिजिटल सहकारी संस्था, सहकारी आर्थिक तंत्रज्ञान आणि शाश्वत ग्रामीण उद्योजकता यासारख्या नव्या जमान्याच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले आहे. या विषयातील डिप्लोमा, डिग्री आणि कौशल्य विकास कार्यक्रम सुरू कऱण्यात येणार आहेत. आगामी काळात सहकार क्षेत्रात काम करणाऱ्यांना वेगाने विकसित होणाऱ्या सामाजिक-आर्थिक परिदृश्यात आवश्यक असलेले ज्ञान देत त्यांना काळासोबत सुसज्ज करणे हा या अभ्यासक्रमांचा उद्देश आहे. त्रिभुवन सहकारी विद्यापीठाची अधिकृत मान्यता ही वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेसाठी एक परिवर्तनाचा क्षण आहे. सहकारी क्षेत्रातील अभ्यासक्रमांसाठी एक मजबूत राष्ट्रीय शैक्षणिक व्यासपीठ तयार होईल.
सहकारातून समृद्धीकडे नेण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल…
‘पुणे लोकसभा मतदारसंघात गेली अनेक वर्षे सहकार क्षेत्रासाठी कार्यरत असलेली वैकुंठभाई मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्था आहे. त्रिभुवन सहकार विद्यापीठाची या संस्थेला देशातील पहिली मान्यता मिळाल्याने आता या सहकार विषयक पूर्ण शैक्षणिक काम व्हॅमनिकॉमला करता येईल. तसेच येथे शिकणाऱ्या सर्वांना अधिकृत विद्यापीठाची पदवी किंवा पदविका किंवा प्रमाणपत्र मिळेल. तसेच या संस्थेत आता सहकार विषयक संशोधनालाही चालना मिळेल. ग्रामीण भागातील युवकांसाठी करिअरचे नवे दालन खुले होईल. त्यामुळे देशातील सहकारापासून समृद्धीकडे नेण्यासाठी हे टाकलेले महत्वपूर्ण पाऊल ठरणार आहे’.
– मुरलीधर मोहोळ, केंद्रीय मंत्री







