
आरोपीचा नेम चुकल्याने सुदैवाने जीव वाचला
पुणे : पुण्यातील बाणेर भागात शुक्रवारी सकाळी एखाद्या चित्रपटामधील कथानकाप्रमाणे घटना घडली. एका तरुणाने डिलिव्हरी बॉयचा वेष परिधान करून ब्रेक अप झालेल्या प्रेयसीवर पिस्तुलातून गोळीबार केला. आरोपीचा नेम चुकल्याने सुदैवाने त्याने झाडलेल्या गोळ्या तरुणीला लागल्या नाहीत. या तरुणीचा जीव थोडक्यात वाचला. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
गौरव महेश नायडू (रा. पिंपरी चिंचवड) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी एमबीएचे शिक्षण घेत असून सध्या ती बाणेर येथील एका खासगी कंपनीत प्रशिक्षणार्थी म्हणून काम करते. शुक्रवारी सकाळी ती कार्यालयात जाण्याच्या तयारीत होती. त्याचवेळी आरोपी गौरव नायडू हा डिलिव्हरी बॉयचा वेष परिधान करून अचानक तिच्यासमोर आला. सुरुवातीला तो तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र, तिने त्याला नकार दिल्यानंतर त्याने संतापाच्या भरात पिस्तुल काढून सलग तीन गोळ्या तिच्या दिशेने झाडल्या. बंदुकीतून सुटलेल्या या गोळ्या तिच्या अगदी जवळून गेल्या; पण सुदैवाने आरोपीचा नेम चुकल्याने तिला काहीही इजा झाली नाही. धास्तावलेली तरुणी किंचाळल्यानंतर इमारतीतील कर्मचारी व सुरक्षा रक्षक तिथे मदतीसाठी धावून आले.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी गौरव नायडू हा आधीपासून गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्यावर पिंपरी-चिंचवड पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नासह गंभीर गुन्हे दाखल आहेत. वैयक्तिक नातेसंबंधातील वादातून त्याने अत्यंत धक्कादायक पाऊल उचलल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे, त्याने हा कट आखूनच डिलिव्हरी बॉयचा वेष घेतल्याचे दिसून येत असल्याचे पोलीस म्हणाले.
गोळीबाराची माहिती मिळताच बाणेर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत आणि परिमंडळ चारचे उपायुक्त सोमय मुंढे यांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्ही तपासले जात आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरून पिस्तुलाच्या तीन रिकाम्या पुंगळ्या आणि एक जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहे. आरोपी सध्या फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी पथके तयार रवाना आली आहेत. पुण्यात यापूर्वीही एकतर्फी प्रेमातून अशा घटना घडल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी सदाशिव पेठेत एका युवकाने प्रेमभंगामुळे तरुणीवर कोयत्याने हल्ला केला होता.
#BanerPuneShooting #PuneCrimeNews #AttemptedMurderPune #GauravNaidu #LoveDisputeCrime #PunePoliceAction #WomanSafetyPune #DeliveryBoyDisguise #PuneBreakingNews #CrimeAlertPune