
प्रस्तावित रिंग रोडमधील जमिनीच्या ७/१२ उतार्याची प्रत देण्यासाठी मागितली होती लाच
पुणे : शहराच्या लगतच्या प्रस्तावित रिंग रोडमध्ये अधिग्रहित झालेल्या जमिनीच्या सातबारा तसेच आठ अ उताराच्या प्रतीसाठी लाच मागणार्या एका महिला तलाठ्यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. हवेली तहसीलदार यांच्या कार्यालयासमोर २५ सप्टेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने लाच मागणार्या तीन महिला तलाठ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
हवेली तालुक्यातील सांगरुळ तलाठी प्रेरणा बबन पारधी (वय ३०, रा. जी सोसायटी, गुलमोहर पार्कजवळ, पाषाण), बहुली गावाच्या तलाठी दिपाली दिलीप पासलकर (वय २९, रा. स्वामी समर्थनगर, काकडेनगर, कोंढवा), खडकवाडी गावच्या तलाठी शारदारदेवी पुरुषोत्तम पाटील (वय ४०, रा. कृष्णकुंज सोसायटी, मोरे वस्ती, मांजरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या महिला तलाठ्यांची नावे आहेत. याबाबत एका ४२ वर्षाच्या तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली आहे. त्यांचा जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांना सांगरुण, बहुली, खडकवाडी आणि कुडजे या हवेली तालुक्यामधील गावांच्या हद्दीतील जमीन खरेदी विक्री करण्यासाठी पुणे शहराच्या लगतच्या प्रस्तावित रिंग रोडमध्ये अधिग्रहित झालेल्या जमिनीच्या ७/१२ तसेच आठ अ उतारचे संगणकीकृत तसेच हस्तलिखित साक्षांकित प्रत हव्या होत्या. त्यासाठी ते सांगरुळ येथे कार्यरत असलेल्या पे्ररणा पारधी, बहुली येथील तलाठी दीपाली पासलकर, तसेच खडकवाडी, कुडजे येथील तलाठी शारदादेवी, पाटील यांना भेटले.
त्यावेळी सांगरुळ गावातील त्यांना आवश्यक असलेल्या ७/१२ च्या व आठ अच्या उताºयाच्या २४० प्रतीसाठी पारधी यांनी त्या प्रतीसाठी असलेल्या सरकारी फीच्या व्यतिरिक्त १६ हजार ४०० रुपयांची लाच मागितली. बहुली गावातील आवश्यक असणार्या ७/१२ व उतार्याच्या आवश्यक असणार्या १०६ प्रतिसाठी दीपाली पासलकर यांनी सरकारी फि व्यतिरिक्त ४ हजार ९१० रुपयांची लाच मागितली. तसेच खडकवाडी व कुडजे गावातील आवश्यक असणार्या ७/१२च्या व उतार्याच्या ३२ प्रतिसाठी शारदादेवी पाटील यांनी सरकारी फी व्यतिरिक्त १५२० रुपयांची लाच मागितली. याची तक्रार त्यांनी १९ सप्टेंबर रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. या तक्रारीची पडताळणी तीनही तलाठींकडे केली़ त्या प्रेरणा पारधी यांनी सरकारी फी ३६०० रुपये होत असताना तक्रारदाराकडून तक्रारी अगोदर ४ हजार रुपये घेतल्याचे कबुल केले. आणखी १२ हजार ४०० रुपयांची लाच मागितली.
दिपाली पासलकर यांनी सरकारी फी १५९० रुपये होत असताना त्यांनी तक्रारदाराकडे ६ हजार ५०० रुपये लाचेची मागणी करुन ती रक्कम प्रेरणा पारधी यांच्याकडे देण्यास सांगितले. शारदादेवी पाटील हिने सरकारी फी ४८० रुपये होत असताना त्यांनी तक्रारदाराकडून तक्रारीपूर्वी १५०० रुपये घेतल्याचे कबुल करुन आणखी २ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने हवेली तहसीलदार कार्यालयाबाहेर २५ सप्टेंबर रोजी सापळा रचला. शारदादेवी पाटील यांना तक्रारदाराकडून २ हजार रुपयांची लाच घेत असताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याकडे पेन ड्राईव्ह, ग्राम महसूल अधिकारी सजा कुडजे यांचा शिक्का, मोबाईल व रोख ११०० रुपये मिळून आले. शारदादेवी पाटील यांच्यावर कारवाई होईपर्यंत अन्य दोन महिला तलाठी या निघून गेल्या़ परंतु, त्यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने झाल्याने तीनही तलाठींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील, अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शैलजा शिंदे व त्यांच्या सहकार्यांनी केली आहे. पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे तपास करीत आहेत.



