
सहकारनगर पोलिसांची मोठी कारवाई
पुणे : पुण्यातील सहकारनगर परिसरात एका तरुणाला मारहाण करून त्याचे दोन मोबाईल लुटणाऱ्या तिघांना पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांत गजाआड केले. आरोपींमध्ये एक प्रौढ व दोन विधिसंघर्षित बालकांचा समावेश आहे.
अनिकेत गणेश शिंदे (वय १९, रा. लक्ष्मीनगर), दोन विधिसंघर्षित बालकांना ताब्यात घेण्यात आले आहे. चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून तब्बल २५ हजार किंमतीचे दोन मोबाईल जप्त केले आहेत. या गुन्ह्याची नोंद भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०९(६), ३(५) अन्वये करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ सप्टेंबर रोजी मध्यरात्री साडेबारा वाजता फिर्यादी पुणे-सातारा रोडने चव्हाणनगर कमान चौकाजवळील काळुबाई मंदिराजवळून जात होते. त्यावेळी कात्रजकडून आलेल्या मोपेडवरील तिघांनी त्यांच्या गाडीला धडक दिली. फिर्यादी चौकशीसाठी खाली उतरल्यावर त्या तिघांनी शिवीगाळ करत “आम्हाला दुखापत झाली, १० हजार रुपये दे” अशी मागणी केली.
पैसे न दिल्याने आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून फिर्यादीकडील दोन मोबाईल जबरदस्तीने हिसकावले आणि पसार झाले. या घटनेवरून सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. ८ सप्टेंबर रोजी पोलिस अंमलदार अमोल पवार व अमित पदमाळे यांना खात्रीशीर माहिती मिळाली की आरोपी ट्रेझर पार्क, सहकारनगर येथील श्रीहरी हॉटेलसमोर काळ्या अॅक्सेस गाडीवर बसून कोणाची तरी वाट पाहत आहेत. पोलिसांनी तत्काळ पथकासह छापा टाकून तिघांना ताब्यात घेतले.
ही कारवाई अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, उपायुक्त मिलींद मोहीते, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुरेखा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.




