
भरदिवसा घरफोडी करणारा चोरटा जेरबंद
पुण्यात कामाला आला असताना केली होती चोरी, समर्थ पोलिसांची कामगिरी
पुणे : पुण्यात कामाला आला असता रास्ता पेठेतील घरात शिरुन भरदिवसा घरफोडी करणार्या चोरट्याला समर्थ पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून २० ग्रॅमची सोन्याची चैन, १० ग्रॅम वजनाच्या २ सोन्याच्या अंगठ्या आणि ६ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी असा ऐवज जप्त केला आहे.
शिवाजी रामचंद्र खंडागळे (वय २९, रा. छत्रपती संभाजीनगर, सांगलीवाडी, मिरज, जि. सांगली) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
याबाबत एका महिलेने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. धनत्रयोदशीच्या दिवशी या महिलेने कपाट उघडले. तेव्हा कपाटात ठेवलेली ५० हजारांची रोकड, दोन तोळ्याच्या २ अंगठ्या, एक तोळ्याची सोनसाखळी असा ऐवज लांबविण्यात आल्याचे लक्षात आले. त्यानंतर तिने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. समर्थ पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासातून मिळालेल्या माहितीवरुन चोरट्याचा मागोवा घेत शिवाजी खंडागळे याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्हा कबुल केला. खंडागळे हा सराईत चोरटा असून त्याच्यावर सोलापूरमधील फौजदार चावडी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा यापूर्वी दाखल आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त ऋषीकेश रावले, सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते, पोलीस निरीक्षक चेतन मोरे, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर फडतरे, पोलीस अंमलदार संतोष पागार, रोहिदास वाघेरे, इम्रान शेख, शिवा कांबळे, अमोल गावडे, शरद घोरपडे, भाग्येश यादव यांनी केली.



