
‘सेवा धर्म महान’ पुस्तिकेचे प्रकाशन
पुणे : कोणत्याही आपत्तीच्या प्रसंगी नागरिकांना केली जाणारी मदत हे ‘सेवा भारती’च्या कार्याचे वैशिष्ट्य आहे. सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठीही ‘सेवा भारती’ने लक्षणीय कार्य केले, अशा शब्दात ‘सेवा भारती’चे अखिल भारतीय संघटन मंत्री सुधीरकुमार यांनी ‘सेवा भारती’च्या कार्याचा गौरव केला.
सोलापूर जिल्ह्यातील पुरामुळे बाधित झालेल्या गावांमध्ये ‘सेवा भारती’च्या वतीने मदत कार्य करण्यात आले. या मदत कार्याची माहिती देणाऱ्या ‘सेवा धर्म महान’ या पुस्तिकेचे प्रकाशन सुधीरकुमार यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात ते बोलत होते. संस्थेच्या अखिल भारतीय महामंत्री रेणूताई पाठक, संयुक्त महामंत्री विजय पुराणिक आणि ‘सेवा भारती’ पश्चिम महाराष्ट्रचे सचिव प्रदीप सबनीस यांची कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती होती.
सुधीरकुमार यांनी सांगितले की ‘सेवा भारती’ने सोलापूर जिल्ह्यात जे मदत आणि पुनर्वसन कार्य केले ते महत्त्वपूर्ण आणि नागरिकांसाठी उपयुक्त ठरणारे आहे.
समाजाने या कामाला जी उत्स्फूर्त साथ दिली ती देखील महत्त्वाची आहे. जनसेवा सहकारी बँक, जनता बँक यासह विविध बँकांमधील कर्मचाऱ्यांनी, शिक्षण संस्थांनी, शिक्षण संस्थांमधील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी तसेच व्यापारी, उद्योजक, सामाजिक संस्था आदींनी या कामाला मोठे सहाय्य केले, अशी माहिती सबनीस यांनी दिली.





