
श्रीमंत होण्याचे सल्ले देणाऱ्या रॉबर्ट कियोसाकी यांचा इशारा; ट्रम्प यांचे ‘टॅरिफ’ अस्त्र विनाशक
#वॉशिंग्टन
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत विजय मिळवल्यापासून आणि अलीकडेच देशाची सूत्रे हाती घेतल्यानंतर जागतिक बाजारात मोठी अस्थिरता दिसत असून त्यातच आता आणखी भर पडण्याची शक्यता दिसत आहे. ‘रिच डॅड पुअर डॅड’ या पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी पुन्हा एकदा गुंतवणूकदारांना मोठा इशारा दिला आहे.
कियोसाकी यांनी यावेळी सोशल मीडिया एक्सवरून सोने, चांदी आणि बिटकॉइनबद्दल धोक्याचा इशारा दिला. सोने, चांदी, बिटकॉइन घसरणीचा धोका निर्माण झाला असून ट्रम्प यांनी इतर देशांवर लादलेले शुल्क संपूर्ण बाजारपेठ उद्ध्वस्त करेल, असे संकेत त्यांनी दिले आहेत. ट्रम्प यांनी मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर लादलेल्या शुल्कामुळे बाजारात पडझड होऊ शकते. कियोसाकी एक लेखक तसेच इन्व्हेस्टर आणि व्यापारीदेखील आहेत, जे अमेरिकेत राहतात.
कियोसाकी यांनी अलीकडच्या पोस्टद्वारे ट्रम्पमुळे सोने, चांदी आणि बिटकॉइनचे भाव घसरू शकतात असा इशारा दिला. तसेच जे लोक वरील इन्व्हेस्टमेंट पर्याय खरेदी करण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी ही पडझड एक चांगली संधी असू शकते, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. त्यांनी लिहिले आहे की किंमत कमी झाल्यावर खरेदी करणे चांगले होईल, त्यांनी याला श्रीमंत होण्याची संधी असेही म्हटले. कियोसाकी म्हणाले की, ट्रम्प टॅरिफ सुरू: सोने, चांदी, बिटकॉइन कमी होऊ शकतात, चांगले आहे. किंमत कमी झाल्यानंतर आणखी खरेदी करू शकतो. खरी समस्या कर्जाची आहे, जी आणखी बिकट होईल. घसरण मालमत्ता विक्रीसाठी आहे. श्रीमंत होण्याची वेळ आली आहे.
दरम्यान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच मॅक्सिको आणि कॅनडामधून येणाऱ्या वस्तूंवर २५ टक्के शुल्क लादले तर, चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर १० टक्के शुल्क जाहीर केले, जे १ फेब्रुवारीपासून लागू झाले आहेत. तिन्ही देशांमध्ये बेकायदेशीर स्थलांतर आणि अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी ट्रम्प यांच्याकडून शुल्काची कारवाई करण्यात आली आहे.