
वाहतूक शाखेकडून कारवाईचा धडाका : १७६८ मॉडीफाईड सायलेन्सरवर बुलडोजर
#पुणे : शहर वाहतूक शाखेच्या वतीने कर्णकर्कश आवाज करणारे सायलेन्सर बसविणाऱ्या बुलेट राजांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. ऐन होळी आणि धूलीवंदनाचा मुहूर्त साधात पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मॉडिफाईड सायलेन्सरवर ‘सर्जिकल स्ट्राईक’ करण्यात आला. या विशेष मोहिमेअंतर्गत १७६८ मॉडिफाईड सायलेन्सरवर बुलडोझर फिरविण्यात आला आहे.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मॉडिफाईड सायलेन्सरवर कारवाईचे आदेश दिले होते. सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त (पुर्व प्रादेशिक विभाग) मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली १७६८ मॉडिफाईड सायलेन्सर जप्त करून त्यावर रोड रोलर फिरविण्यात आला. पुणे शहरातील बेशिस्त वाहनचालकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामध्ये बुलेट, दुचाकी वाहनांच्या सायलेन्सरमध्ये फेरफार करून अथवा नवीन मॉडीफाय केलेला सायलेन्सर बसवुन सार्वजनिक रस्त्यावर, रहिवासी भागात दिवसा / रात्री कर्कश आवाज करत भरधाव वेगाने बुलेट चालवून लोकांचे लक्ष वेधुन घेण्याचे प्रकार तरूणांमध्ये वाढत आहेत.
या कर्कश आवाजाने जेष्ठ नागरिक, महिला, शांतताप्रिय नागरिकांना त्रास होत होता. याबाबतच्या अनेक तक्रारी नागरिंकाकडुन प्राप्त झाल्याने अशा बेकायदेशीर सायलेन्सर बसविलेल्या दुचाकी वाहनांवर कठोर कारवाई करण्याबाबतच्या सूचना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिल्या होत्या. त्यानुसार, वाहतूक शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे यांनी विशेष मोहीम हाती घेतली. वाहतूक शाखेच्या सर्व विभागांना तशा सूचना देण्यात आल्या. तसेच, बुलेट सायलेन्सर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात सुरुवात करण्यात आली. यापुढे अशा प्रकारचे सायलेन्सर विक्री करणाऱ्या व बसविणाऱ्या गॅरेज मालिकांवरही कारवाई करण्यात येणार असल्याचे उपायुक्त झेंडे यांनी सांगितले.