
– पाच-सहा दरोडेखोरांचा हल्ला ; प्रतिकार करणाऱ्या दाम्पत्याला चाकूने भोसकले
पिंपरी चिंचवड : खेड तालुक्यातील बहुळ गावात मध्यरात्री दरोडेखोरांनी धुमाकूळ घालून एका कुटुंबाला चाकूच्या धाकावर ओलीस धरले. वृद्धांना धमकावून दागिने आणि रोकड लुटल्यानंतर, तरुण दाम्पत्याने प्रतिकार करताच चोरट्यांनी त्यांच्यावर थेट चाकूने जीवघेणा हल्ला चढवला. या घटनेमुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पिंपरी- चिंचवड पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली आहे.
पोलीस सहआयुक्त शशिकांत महावरकर यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. पीडित कुटुंबाशी संवाद साधून त्यांना धीर दिला आणि पुढील सुरक्षेच्या उपाययोजनांसाठी आवश्यक निर्देश दिले. तसेच, वृद्ध दाम्पत्याला पोलीस वाहनाने सुखरूप घरी पोहोचवण्यात आले.
जयराम लक्ष्मण वाडेकर (वय ६७) हे आपल्या कुटुंबासोबत बहुळ गावातील फुलसुंदर वस्ती येथे राहतात. त्यांच्या कुटुंबात पत्नी शालन (वय ६५), मुलगा अशोक (वय ३५), सून उज्वला (वय ३२) आणि दोन लहान नातवंडे आहेत. जयराम वाडेकर शेती करतात, तर त्यांचा मुलगा अशोक सणसवाडी येथील कंपनीत नोकरी करतो.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. २३) अशोक आणि उज्वला हे शिवनेरी येथे दर्शनासाठी गेले होते. रात्री १० वाजण्याच्या सुमारास ते घरी परतल्यानंतर कुटुंबाने जेवण करून झोप घेतली. मध्यरात्री अचानक पाच-सहा चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. झोपलेल्या जयराम वाडेकर यांना अचानक पत्र्याच्या पेटीचा आवाज आल्याने जाग आली. त्यांनी पाहिले असता, २० ते २५ वयोगटातील जाडसर, सावळ्या वर्णाचा एक चोरटा हातात धारदार चाकू घेऊन त्यांच्याजवळ बसला होता. “गप्प राहा, नाहीतर चाकू भोसकतो!” अशी धमकी देत त्याने त्यांना जागेवरून हलण्यास मज्जाव केला.
दरम्यान, इतर दोन चोरटे खोलीतील कपाटे आणि पेट्या फोडत होते. हॉलमध्ये झोपलेल्या शालन वाडेकर यांनी आवाज ऐकून घाबरत चोरट्यांना “काय घ्यायचे ते घ्या, पण आम्हाला मारू नका!” अशी विनवणी केली. मात्र, तरीही चोरट्यांनी हात उचलत त्यांच्या अंगावरील दागिने हिसकावले.
मुलगा आणि सुनेला चाकूने भोसकले
जयराम आणि शालन यांचा ऐवज काढून घेतल्यानंतर चोरटे शांत बसले नाहीत. त्यांनी अशोक आणि उज्वला यांच्या बेडरूमचा दरवाजा कटावणीच्या साहाय्याने तोडला. अचानक दरवाजा उघडल्याने अशोक आणि उज्वला जागे झाले. प्रतिकार करताच, चोरट्यांनी दोघांच्या पोटात थेट चाकू भोसकला, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दाम्पत्याने मदतीसाठी आरडाओरड केली. त्यावेळी शालन वाडेकर यांनी मुलाला व सूनेला वाचवण्यासाठी धाव घेतली, मात्र, चोरट्यांपैकी एकाने त्यांना काठीने मारहाण केली.
बाहेरून कडी लावून केला पोबारा
यामध्ये चोरट्यांनी १ लाख ३२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि १२ हजार रुपये रोख रक्कम लंपास केली आहे. हल्ल्यानंतर चोरटे घाईघाईने पळून गेले. जाताना त्यांनी घराची बाहेरून कडी लावून घेतली.
गावात भीतीचे वातावरण
या धक्कादायक घटनेनंतर संपूर्ण गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिक प्रशासन हादरले आहे. घटनास्थळी पिंपरी- चिंचवड पोलिसांनी धाव घेतली असून, सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू आहे.